

पुणे: शहरातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या दिवसाआड पाणीपुरवठा निर्णयामुळे निर्माण झालेल्या अडचणींवरून बुधवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. पाणीपुरवठा नियोजन पूर्णपणे कोलमडल्याचा आरोप विरोधकांनी करत प्रशासनाला धारेवर धरले, तर नागरिकांच्या अडचणी गंभीर असल्या तरी दोषारोपांच्या राजकारणापेक्षा उपाययोजनांवर भर देण्याची भूमिका सत्ताधाऱ्यांनी मांडली.
विरोधी पक्षनेते ॲड. निलेश निकम यांनी पुणेकरांना वेळेवर पाणी कसे मिळणार, असा सवाल उपस्थित करत नियोजनातील त्रुटींवर बोट ठेवले. निवृत्ती बांदल यांनी अनेक भागांत पिण्याच्या पाण्यात सांडपाणी मिसळत असल्याची तक्रार केली. यावर सभागृह नेते गणेश बिडकर यांनी परिस्थिती गंभीर असल्याचे मान्य करत, दिवसाआड पुरवठ्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात काही तांत्रिक अडचणी अपेक्षित असल्याचे सांगितले. धरणांमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा असल्याचे नमूद करत त्यांनी नागरिकांचे फोन न उचलणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. "धरणात पाणी नसेल तर प्रशासन जादू करू शकत नाही," असे सांगत वस्तुस्थिती समजून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
अरविंद शिंदे यांनी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. अतुल तरवडे यांनी हांडेवाडी, उरुळी, होळकरवाडी आणि मोहम्मदवाडी भागात चार ते सहा दिवस पाणी मिळाले नसल्याची तक्रार मांडली. नदाफ यांनी ताडीवाला रस्ता परिसराला कपातीतून वगळण्याची मागणी केली, तर अजित घुले यांनी मांजरी परिसरातील विहिरींच्या पाणीपुरवठ्यावर विद्युत विभागाच्या कारवाईमुळे परिणाम होत असल्याचा आरोप केला. प्रशांत जगताप यांनी नागरिकांना पूर्वकल्पना देण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे सांगितले. अनिता इंगळे यांनी रिंग रोड प्रकल्पासाठी धरणातील पाण्याच्या वापराचा मुद्दा उपस्थित करत पर्यायी स्रोतांचा विचार करण्याची मागणी केली.
अर्चना पाटील यांनी जुन्या पाणीवाहिन्यांच्या नूतनीकरणाची गरज अधोरेखित केली. कॉंग्रेसचे गटनेते चंदू कदम यांनी आपत्कालीन परिस्थितीची कल्पना असूनही उपाययोजना का केल्या नाहीत, असा सवाल उपस्थित केला. अनिल सातव यांनी वाघोली-लोहगावमधील रखडलेल्या पाणीटाकी प्रकल्पांकडे लक्ष वेधले. प्रतीक कदम यांनी धरणांचे खोलीकरण व गाळ काढण्यासाठी स्वतंत्र निधीची मागणी केली. रुपाली पवार यांनी विभागांतील समन्वयाअभावी पाणी वाया जात असल्याचे सांगितले, तर सुरेखा कवडे, महेश वाबळे, सुभाष नाणेकर आणि गफूर पठाण यांनी विविध भागांतील अपुरा पुरवठा, घाण पाणी आणि गंभीर परिस्थितीची उदाहरणे सभागृहासमोर मांडली.
गदारोळात पाण्याचा प्रश्न पडला मागे
पंधरा दिवसापूर्वी प्रार्थनास्थळावरील अतिक्रमण कारवाईवरून महापालिका मुख्यसभेत बुधवारी गदारोळ झाला. पाणीपुरवठ्याचा विषयावर बोलत असताना गफूर पठाण यांनी प्रार्थनास्थळावर बोलू देण्याची विनंती केली. त्यावरून सत्ताधारी त्यांच्यावर धाऊन गेले आणि सभेत घोषणाबाजी झाली. गदारोळ वाढल्याने पाणी प्रश्नावर प्रशासकीय बाजू न मांडताच सभा तहकूब करण्यात आली. यामुळे तब्बल ६० लाख पुणेकरांचा महत्वाचा प्रश्न मागे पडला.