

वेल्हे: पुणे शहर व जिल्ह्यातील एक कोटी नागरिकांची तसेच ६६ हजार हेक्टर शेतीची तहान भागवणाऱ्या खडकवासला धरणसाखळीच्या क्षमतेच्या ९० टक्के पाणी गेल्या दोन महिन्यांत पिण्यासाठी व उजनी धरणात सोडले. जवळपास २७ टीएमसी पाणी सोडूनही धरणसाखळी ओव्हरफ्लो आहे. चारही धरणाच्या सांडव्यातून विसर्ग सुरू आहे.
दोन महिन्यांनंतर पावसाने गुरुवारी (दि. ३) तुरळक अपवाद वगळता दिवसभर उघडीप दिली. गुरुवारी सायंकाळी ५ वाजता २९.१५ टीएमसी क्षमतेच्या धरणसाखळीत २९.१२ टीएमसी म्हणजे ९९.८८ टक्के पाणी होते.
साखळीत जवळपास १०० टक्के साठा शिल्लक आहे . गुरुवारी दिवसभरात टेमघर येथे ५, पानशेत येथे २ व वरसगाव येथे ३ मिलिमीटर पाऊस पडला. दिवसभर ढगाळ वातावरण असले तरी कडकडीत ऊन पडले होते. अल-निनो च्या पार्श्वभूमीवर कमी पावसाचा अंदाज वर्तवला असताना यंदा पानशेत वरसगाव धरण खोऱ्यातील घाट माथ्यासह सिंहगड, मुठा-मोसे भागात अतिवृष्टीसह दमदार पाऊस पडला.
जून महिना कोरडा गेल्याने ३० जून रोजी धरणसाखळीत अल्प पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे पुणेकरांसह जिल्ह्यातील नागरिकांवर भीषण पाणीटंचाईचे संकट उभे होते; मात्र जुलै सुरू होताच धरणक्षेत्रात पावसाने हाहाकार उडवला. त्यामुळे खडकवासला धरण १०० टक्के भरून वाहू लागले त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर तिन्ही धरणे १०० टक्के भरून वाहू लागली. धरणे भरल्याने पानशेत व वरसगावमधून प्रत्येकी ६०० तर टेमघरमधून २५० क्युसेक विसर्ग सुरू आहे.
या तिन्ही धरणांच्या विसर्गाची तसेच धरणक्षेत्रातील पाण्याची खडकवासलात भर पडत आहे. खडकवासलातून मुठा नदीच्या पात्रात ८५६ क्युसेक विसर्ग सुरू आहे. या शिवाय खडकवासलातून पिण्यासाठी बंदिस्त जलवाहिन्यातून ६३१ तसेच उपनगरे व जिल्ह्यातील नागरिकांना मुठा कालव्यातून १ हजार ५४ क्युसेक पाणी सोडले जात आहे. एवढे पाणी सोडूनही खडकवासलाची पातळी १०० टक्क्यावर कायम आहे.
धरणातून मुठा नदीपात्रात दोन महिन्यांत तब्बल १८.८६ टीएमसी पाणी सोडण्यात आले. या पाण्याचा लाभ उजनी धरणाला झाला. या पिण्यासाठी पुणे व जिल्ह्यातील रहिवाशांना ८ टीएमसीपेक्षा अधिक असे मिळून जवळपास २७ टीएमसी पाणी सोडण्यात आले. धरणक्षेत्रात पावसाचा जोर ओसरला असला तरी नद्या, ओढे-नाल्यांतून पाण्याचे प्रवाह मंदगतीने सुरू आहेत. त्याची भर धरणसाखळीत पडत आहे. त्यामुळे चारही धरणातून जादा पाणी सोडण्यात येत आहे.
- विरेश राऊत, शाखा अभियंता, खडकवासला धरण