मस्करीने घेतला जीव! गुदद्वारात कॉम्प्रेसरद्वारे हवा; अल्पवयीन मुलाचा मृत्यू

मस्करीने घेतला जीव! गुदद्वारात कॉम्प्रेसरद्वारे हवा; अल्पवयीन मुलाचा मृत्यू

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कॉम्प्रेसर यंत्रातील हवा पाइपद्वारे अल्पवयीन मुलाच्या गुदद्वारात सोडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना हडपसर औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यात घडली. मोतीलाल साहू (वय 16, मूळ रा. मध्य प्रदेश) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.
या प्रकरणात कामगार धीरजसिंग गोपालसिंग गौड (वय 21) याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत मोतीलालचा मामा शंकरदीन रामदीन साहू (वय 34, रा. बडागाव, जि. कटनी, मध्य प्रदेश ) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर येथील औद्योगिक वसाहतीत पूना फ्लोअर अँड फुड्स कारखाना आहे. या कारखान्यात मोतीलालचा मामा शंकरदीन आणि आरोपी धीरजसिंग कामाला आहेत. कारखान्यातील आवारात ते राहायला असताना मोतीलाल आणि धीरजसिंग यांची मैत्री झाली.

दोन दिवसांपूर्वी कारखान्यात तिसर्‍या मजल्यावर धीरजसिंग काम करीत होता. कॉम्प्रेसरमधील हवेद्वारे मैदा तयार करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या यंत्राची सफाई करतेवेळी मोतीलाल तेथे थांबला होता. चेष्टामस्करीतून धीरजसिंगने हवेचा पाइप मोतीलालच्या गुदद्वाराजवळ लावला. पाइपमधील हवा पोटात शिरल्याने मोतीलाल जागीच कोसळला. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक महेश कवळे करीत आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news