

- पहिले महाराष्ट्रीयन ठरले गिर्यारोहक
- 8000 मीटर शिखरावर चढाई
पुणे : महाराष्ट्र व भारताच्या गिर्यारोहण क्षेत्रासाठी आज अत्यंत अभिमानाचा व आनंदाचा दिवस आहे. गिरिप्रेमीचे अनुभवी गिर्यारोहक जितेंद्र गवारे यांनी 10 मे 2 रोजी सकाळी 4:50 वाजता (स्थानिक वेळेनुसार) यशस्वीपणे माउंट मकालू (8,485 मीटर) शिखरावर यशस्वी चढाई केली. या पराक्रमासह, ते सात 8000 मीटर शिखरांवर चढाई करणारे पहिले महाराष्ट्रीयन गिर्यारोहक ठरले आहेत. त्याचबरोबर, नेपाळ हिमालयातील सर्व आठ-हजार मीटर शिखरांवर चढाई करणार्या मोजक्या भारतीय गिर्यारोहकांमध्ये त्यांचा समावेश झाला आहे.
जितेंद्र यांनी माउंट एव्हरेस्ट, माउंट कांचनजुंगा, माउंट ल्होत्से, माउंट धौलागिरी, माउंट मनासलू, माउंट अन्नपूर्णा-1 व आज माउंट मकालू अशा सात शिखरांवर चढाई केली आहे. या सातत्यपूर्ण यशामागे त्यांची चिकाटी, कौशल्य आणि गिर्यारोहणाची निष्ठा आहे. त्यांना यापूर्वी महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती पुरस्कारने सन्मानित केले आहे.
या यशस्वी प्रवासामागे दिग्गज गिर्यारोहक आणि तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कारप्राप्त उमेश झिरपे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. या विशेष प्रसंगी उमेश झिरपे म्हणाले, जितेंद्रची समर्पणाची भावना, नम्रता आणि शिस्त सदैव उल्लेखनीय राहिली आहे. आजचे त्यांचे यश केवळ वैयक्तिक नाही, तर महाराष्ट्राच्या गिर्यारोहण इतिहासातील एक सुवर्णक्षण आहे. त्याच्या या प्रवासात मार्गदर्शक होण्याचा मला अभिमान आहे.
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ यांनी जितेंद्र यांच्या मकालू मोहिमेस पाठबळ दिले. विद्यापीठाचे माननीय कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी विशेष पाठिंबा व प्रोत्साहन दिले, ज्यामुळे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरू शकले.