पुणे: महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची स्वत मालकीची 17.22 लाख मेट्रिक टन साठवणूक क्षमता असून 7.22 लाख मेट्रिक टन भाडेतत्त्वावरील गोदामांची क्षमता मिळून एकूण 24 लाख मेट्रिक टन क्षमता आहे.
त्यामध्ये वाढ करुन नव्याने 60 हजार मेट्रिक टनापर्यंतची गोदामांची साठवणूक क्षमता निर्मितीसंदर्भात व्यवहार्य नियोजन करण्याच्या सूचना पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिल्या. राज्यातील गोदामाचे मुल्यांकन करुन घेतल्यास केंद्र सरकारच्या सवलतीचा लाभ घेता येईल, असेही ते म्हणाले. (Latest Pune News)
मार्केट यार्डातील वखार महामंडळाच्या मुख्यालयात शुक्रवारी संचालक मंडळाची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कौस्तुभ दिवेगावकर, सह व्यवस्थापकीय संचालक दीपक शिंदे आदींसह अधिकारी उपस्थित होते.
राज्यात केंद्र सरकारच्या हमीभाव योजनेत नाफेड व एनसीसीएफ यांच्या माध्यमातून शेतमालाची खरेदी होऊन त्या शेतमालाच्या साठवणूक ही वखार महामंडळाच्या गोदामात होते. तसेच शेतकर्यांचा शेतमालाचीही साठवणूक होते.
शेतमाल साठवणूक तंत्रज्ञानाचा अभ्यास करुन तांत्रिकद़ृष्ट्या अद्ययावत साठवणूक तंत्रज्ञान विकसित करण्याच्यादृष्टीने नियोजन करण्याची सूचना करून रावल म्हणाले की, राज्यातील गोदामांमध्ये सनियंत्रण तसेच कामकाजात पारदर्शकता राहण्याच्या दृष्टीने सीसीटीव्ही बसवावेत. त्यांचे नियंत्रण कक्ष पुणे येथील वखार महामंडळाच्या कार्यालयातून करावे.
दिवेगावकर यांनी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची मागील तीन वर्षाची तुलनात्मक आर्थिकस्थिती, साठवणूक क्षमता व वापर, शेतकर्यांसाठी सोई-सुविधा, शेतमाल तारण कर्ज योजना, हमीभाव खरेदी आदंची माहिती दिली.
मुख्यमंत्र्यांचे हस्ते होणार अॅग्रो लॉजिस्टिक पार्कचे उद्घाटन
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जांबरगांव येथील अॅग्रो लॉजिस्टीक पार्कचे काम जवळपास पूर्ण झाले असून त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लवकरच होणार असल्याचे रावल यांनी सांगितले. तसेच लातूर येथील 10 हजार मेट्रिक टन क्षमतेचे सायलो निर्माण कार्याचे भूमिपजन करण्यात येणार आहे.