

सुवर्णा चव्हाण
पुणे: लोकसाहित्याशी संबंधित तीन पुस्तकांचे प्रकल्प... काही महिन्यांपूर्वी प्रकल्पासाठी निधी मंजूरही झाला... पण, पुढे काय? तर काहीच नाही... महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीचे तीन प्रकल्प अजूनही निधीअभावी रखडले आहेत. प्रकल्पांसाठी निधी मंजूर होऊनही त्याला अद्यापही गती मिळालेली नाही.
प्रकल्पांकडे सरकार दरबारी दाद मिळत नसल्याचे चित्र आहे. सध्या समितीच्या सदस्यांना बैठक घेण्यासाठीही जागा उपलब्ध होत नसल्याचेही चित्र असून, समितीचे पुण्यात स्वत:चे कार्यालय नसल्यामुळेही अनेक अडचणींचा सामना समितीला करावा लागत आहे. (Latest Pune News)
लोकसाहित्याचे संशोधन, जतन करण्यासह लोकसाहित्याचा प्रसार करणे या उद्देशाने लोकसाहित्य समिती स्थापन करण्यात आली आहे. कोरोना काळानंतर 17 जुलै 2023 मध्ये समितीचे पुनर्गठन करण्यात आले. समितीच्या अध्यक्षपदी शाहीर हेमंतराजे मावळे, सचिवपदी डॉ. भावार्थ देखणे आदींची निवड करण्यात आली. समिती पुनर्गठीत झाल्यानंतर समितीचे कामकाजही सुरू झाले. ही समिती उच्च आणि तंत्र विभागाच्या अंतर्गत येते.
या विभागाकडून 50 शाहिरांच्या पोवड्यांचे पुस्तक प्रकाशित करण्यासह आणखी दोन पुस्तकांच्या प्रकल्पांसाठी निधी मंजूर झाला आहे. पण, हा निधी मंजूर होऊन काही महिने उलटून गेले असले तरी समितीला अद्यापही प्रकल्पांसाठीचा निधी मिळालेला नाहीत.
त्यामुळेच लोकसाहित्यांशी संबंधित असलेल्या या तीन पुस्तकांच्या प्रकल्पाला गती मिळालेली नाही. त्यात समितीला अजून पुण्यात स्वतःचे कार्यालय मिळालेले नसल्याची स्थिती असून, आम्ही बैठक कुठे घ्यावी? हा प्रश्नसुद्धा समिती सदस्यांसमोर आहे. समितीच्या प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
समितीचे अध्यक्ष हेमंतराजे मावळे म्हणाले, समितीच्या तीन प्रकल्पांसाठी निधी मंजूर झाला आहे, निधीसाठी आम्ही विभागाकडे पाठपुरावा करत आहोत. हा निधी लवकरात लवकर मिळावा आणि प्रकल्पांना गती मिळावी, हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे विभागाने त्याकडे लक्ष द्यावे.
समितीला मिळेना पुण्यात कार्यालय
लोकसाहित्य समितीला अजूनही पुण्यात कार्यालय मिळालेले नाही. उच्च शिक्षण विभागाकडून समितीने कार्यालय देण्याचे असे आश्वासन दिले होते, पण त्यावर कोणतीही पाऊले उचलली गेलेली नसून, विभागातील एका हॉलमध्ये लोकसाहित्य समितीतील पदाधिकार्यांना बैठक घ्यावी लागत आहे. समितीला पुण्यात कार्यालय देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.