कुरकुंभ : जिरेगाव परिसरात (ता. दौंड) अद्याप समाधानकारक पाऊस पडलेला नाही. पावसाळ्याचे तीन महिने उलटून गेले, तरी अद्याप अपेक्षित पाऊस झालेला नाही. परिणामी, जिरेगावकरांची तहान भागविणार्या जिरेगाव तलावाने तळ गाठला आहे. त्यामुळे जिरेगावात पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. जिरेगाव तलावावर परिसरातील अनेक वाड्यावस्त्या अवलंबून आहेत. तलावाची साठवणक्षमता 60 दशलक्ष घनफूट आहे. जनाई शिरसाई योजनेतूनही तलावात पाणी सोडले जाते. त्यावर शेतीदेखील केली जाते.
यंदा जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावली नाही.
आता सप्टेंबर सुरू झाला आहे. सध्या तलावातील पाण्याची स्थिती गंभीर आहे. मध्यंतरी झालेल्या थोड्या पावसावर शेतकर्यांनी पेरण्या केल्या. परंतु, त्या आता वाया गेल्या आहेत. आकाशात ढग दाटून येत असले, तरी पाऊस काही पडत नाही. त्याचा परिणाम ऊस, कांदा, मका, बाजरीच्या उत्पन्नावर होणार आहे. सप्टेंबर महिना सुरू झाल्यापासून वातावरणात बदल होत आहे. उन्हाचा प्रचंड तडाखा जाणवत होता. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे. सध्या पाऊस अजिबातच नसल्याने तलावातील पाण्याने तळ गाठला आहे. विहिरी, कूपनलिका, बंधारे कोरडे पडू लागले आहेत. त्यामुळे पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
पाऊस व तलावातील पाण्यावर आम्ही शेती करतो. पाण्याविना पिकांना फटका बसत आहे. नगदी पिके जळण्याच्या मार्गावर आहे. प्रशासनाने आमचा पीकविमा मंजूर करावा. जनाई योजनेतून पाणी तलावात सोडावे. लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावावा.
-राजेंद्र मचाले, शेतकरी
गत वर्षीच्या तुलनेत कमी पाऊस
1 जून ते 31 ऑगस्ट 2022 दरम्यान सरासरी 341.5 मिमी पाऊस झाला. याच कालावधीत यंदा फक्त 93.25 मिमी पाऊस झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत 248.25 मिमी इतका पाऊस कमी पडला आहे.
हेही वाचा