Ashadhi Wari 2023 : जेजुरीनगरी माउलींच्या सोहळ्यासाठी सज्ज

Ashadhi Wari 2023 : जेजुरीनगरी माउलींच्या सोहळ्यासाठी सज्ज

जेजुरी  (पुणे ) : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे कुलदैवत व बहुजन समाजाचा लोकदेव असणार्‍या श्री खंडोबादेवाची सुवर्णनगरी जेजुरी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी सज्ज झाली आहे. जेजुरी नगरपरिषदेच्या वतीने पाणी, स्वच्छता, आरोग्य आणि वीज आदी सुविधा पूर्ण झाली असून, शहरातील साडेपाच हजार घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. यासोबतच औषध फवारणी, धुरळणी करण्यात आल्याचे जेजुरी पालिकेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले यांनी सांगितले.

जेजुरीनगरीत शुक्रवारी (दि. 16) संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा मुक्कामी विसावत आहे. श्री खंडोबा हा शिवाचा अवतार, तर पांडुरंग हा वैष्णवाचा अवतार मानला जातो. या सोहळ्यात शिव व वैष्णवभक्तीचा मिलाफ वारकरी बांधवांच्या माध्यमातून होत असतो. पंढरीच्या वाटेवर कुलदैवताचे दर्शन आणि मल्हारीच्या बेल-भंडाराच्या वारीसाठी वारकरी आसुसलेला असतो. या वारीत हजारो वारकरी बांधव जेजुरीगड व कडेपठार गडावर जाऊन श्री खंडोबादेवाचे दर्शन घेतो. अबीर-गुलालाबरोबरच भंडारा उधळून शिव आणि वैष्णवभक्तीचा मिलाफ साजरा करण्यात येतो.

या सोहळ्यात पालखी सोहळ्यातील वारकरी बांधवांसाठी सोईसुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शासकीय पातळीवर जय्यत तयारी सुरू आहे. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलिस महासंचालक सुनील फुलारी, पोलिस अधीक्षक अंकित गोयल, आळंदी देवसंस्थान व पालखी सोहळा समितीचे विश्वस्त, प्रांताधिकारी, तहसीलदार तसेच विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी जेजुरी पालखीतळाला भेट देत पाहणी करून सूचना दिल्या होत्या.
शहरात वारकरी बांधवांसाठी नऊ ठिकाणी टँकर भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

पालखीतळ व शहरात स्वच्छता मोहीम राबवून रस्त्यावरील खड्डे बुजवून कच्च्या रस्त्यांचे सपाटीकरण करण्यात आले आहे. आरोग्य सुविधा तसेच विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. पालखीतळाबरोबरच शहरातील 12 ठिकाणी 1 हजार 400 शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील रस्त्याच्या वळणावरील पोस्टर्स, बॅनर्स काढण्याचे काम सुरू करण्यात आल्याचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले यांनी सांगितले.

जेजुरीकर नागरिकांना संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाची आस लागली असून, दर्शनाबरोबरच वारकरी बांधवांची सेवा करण्यासाठी जेजुरीनगरी सज्ज झाली आहे. दरम्यान, नव्याने विकसित करण्यात आलेल्या पालखीतळ परिसरात झाडे लावली जात असून, हरितवारीअंतर्गत या वर्षी 500 झाडे लावली जात आहेत. याची सुरुवात महसूलमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आली आहे.

नव्याने विकसित पालखीतळावरील सुविधा पूर्ण
श्री खंडोबादेवाच्या गडाच्या पायथ्याशी व ऐतिहासिक होळकर तलावाकाठी रमणीय भागात सुमारे नऊ एकर जागेत गतवर्षी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी पालखीतळ विकसित करण्यात आला आहे. जेजुरी नगरपरिषदेच्या वतीने पालखी तळाचे सपाटीकरण पूर्ण करण्यात आले असून, या तळावर पाच लाख लिटर पिण्याच्या पाण्याची टाकी राखीव ठेवण्यात आली आहे. तसेच, तळावर नळ कोंढाळे बसविण्यात आले आहेत…..

हे ही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news