Ashadhi Wari 2023 : रखरखत्या उन्हात माउलींच्या पालखीचे पुरंदरमध्ये स्वागत | पुढारी

Ashadhi Wari 2023 : रखरखत्या उन्हात माउलींच्या पालखीचे पुरंदरमध्ये स्वागत

नीलेश झेंडे : 

दिवे : पुण्यातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर ‘एवढा करा उपकार, देवाला सांगा नमस्कार’, असे म्हणत पुणेकरांनी संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकोबारायांच्या पालखीला भावपूर्ण निरोप दिला. माउलींचा पालखी सोहळा पुण्यातून मार्गस्त झाल्यानंतर दुपारी 2 वाजता वडकीनाला येथे विसाव्यासाठी थांबला. तेथे वडकीकरांनी माउलींचे जंगी स्वागत केले. या वेळी अनेक सार्वजनिक मंडळांनी आणि दानशूर व्यक्तींनी अन्नदान केले.

त्यानंतर दुपारी 3 वाजता सर्वांत अवघड टप्पा समजला जाणार्‍या दिवे घाटातील वाट सुरू झाली. वातावरणात या वर्षी उन्हाचा चटका जाणवत असल्याने उन्हाचा त्रास वारकर्‍यांना झाला. मोठ्या अंतराचा हा टप्पा चढताना न थकता दिंडीतील वारकरी अभंग, भारुडे म्हणत एक-एक टप्पा पार करीत होते. वारकर्‍यांमध्ये एक वेगळेच चैतन्य संचारले होते. सारे जण विठूनामाच्या भक्तिरसात चिंब होऊन नाचत होते. दिवे घाट चढून पालखीने सायंकाळी साडेपाच वाजता पुरंदर तालुक्यात प्रवेश केला. या वेळी ’भाग गेला शीण गेला, अवघा झाला आनंद…’ अशा ओळी अलगद ओठांवर उमटत होत्या.

अखेर झेंडेवाडीकरांनी सजवलेल्या भव्य विसाव्या ठिकाणी पालखी थांबली. पालखीच्या स्वागतासाठी खासदार सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी मंत्री दादा जाधवराव, बाबासाहेब जाधवराव, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार, तसेच गटविकास अधिकारी अमिता पवार, भोरचे उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप, विनय झिंजुरगे, सुप्रिया दुरांदे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, विजय कोलते, सुदामअप्पा इंगळे, दिवे-गराडेच्या माजी जिल्हा परिषद सदस्य ज्योती झेंडे, दिवे गावचे सरपंच गुलाब झेंडे, झेंडेवाडीचे सरपंच शिवाजी खटाटे, पोलिस पाटील बाळासाहेब झेंडे, अमर झेंडे, झेंडेवाडीच्या पोलिस पाटील सारिका झेंडे, ऋषीकेश झेंडे, सुधीर झेंडे, अनिल झेंडे, सागरतात्या काळे, रमेश झेंडे, विशाल राऊत, भरत झेंडे, पप्पू भाडळे, माजी उपसरपंच रूपाली झेंडे आदी उपस्थित होते.

पुढे दिवेकरांनी पालखीचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. दिवे फाट्यावर प्राथमिक आरोग्य उपकेंद्र दिवे यांच्या वतीने वारकर्‍यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येत होती. या वेळी जवळपास एक हजाराच्या आसपास वारकर्‍यांवर उपचार केल्याची माहिती अशोक देवकाते यांनी दिली. त्यानंतर सोहळा दोन दिवसांच्या मुक्कामासाठी संत सोपानदेवांच्या सासवडनगरीत रात्री 8 वाजता पोहोचला.

पालखी सोहळा कोरडा; शेतकरी चिंतेत
पालखी सोहळा दर वर्षी एकादशीला पुरंदर तालुक्यात प्रवेश करतो. या वेळी हमखास वरुणराजाचे म्हणजे पावसाचे आगमन होत असते, असा कित्येक वर्षांपासूनचा अनुभव आहे. मात्र, या वर्षी पालखी सोहळा कोरडा गेल्याने शेतकर्‍यांमध्ये काळजीचे वातावरण होते.

Ashadhi wari 2023 : पोलिसांच्या धसक्याने वारीतील चोरटे ’अंडरग्राउंड’

Ashadhi Wari 2023 : फुलांच्या पायघड्यांनी तुकोबारायांच्या पालखीचे लोणी काळभोरला स्वागत

Back to top button