पिंपरी-चिंचवडकरांच्या सुरक्षिततेसाठी जेम्स आणि सिम्बा

पिंपरी-चिंचवडकरांच्या सुरक्षिततेसाठी जेम्स आणि सिम्बा
Published on
Updated on

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : शहरवासीयांच्या सुरक्षिततेसाठी दोन अनुभवी श्वानांची पिंपरी- चिंचवड पोलिस दलाच्या आस्थापनेवर बदली करण्यात आली आहे. जेम्स आणि सिम्बा, अशी या विशेष पोलिस अधिकार्‍यांची (झरु जषषळलशीफी) नावे आहेत. पुणे शहर पोलिस दलातील टीम के 9 मध्ये कार्यरत असताना या दोन्ही श्वानांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याच्या नोंदी आहेत. फुग्यांची सजावट, रांगोळी आणि फुलांची उधळण करीत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी जेम्स आणि सिम्बाचे स्वागत केले.

शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी 15 ऑगस्ट 2018 रोजी पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली. दरम्यानच्या काळात शहराला पाच पोलिस आयुक्त लाभले. यातील प्रत्येकाने आपल्या पातळीवर श्वान आणि बॉम्बशोधक- नाशक मिळवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र पाच वर्षात पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाला नेहमीच दुय्यम दर्जा देत दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी एखादी घटना घडल्यानंतर पिंपरी- चिंचवड पोलिसांना पुणे शहर पोलिसांच्या पथकांची वाट पाहावी लागत होती.

दरम्यान, डिसेंबर 2022 मध्ये तत्कालीन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडून विनयकुमार चौबे यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर चौबे यांनी पिंपरी- चिंचवड पोलिस दलाच्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्याकडे विशेष लक्ष दिल्याचे दिसून येते. नुकतेच शहरासाठी दोन उपायुक्त आणि चार सहायक आयुक्तांची पदेदेखील मंजूर झाली आहेत. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी आयुक्तालयात श्वान पथकही कार्यान्वित करण्यात आले आहे. आगामी काळात शहरात घडणार्‍या गंभीर गुन्ह्यांची उकल होण्यासाठी तसेच, गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलिस दलात सेवा बजावलेल्या अनुभवी जेम्स आणि सिम्बाची मोठी मदत होणार आहे.

तीन प्रकारे होतो वापर

श्वानांचा गुन्हेशोधक, अमली पदार्थ शोधक आणि बॉम्बशोधक या तीन प्रकारे वापर करण्यात येतो. खून, दरोडा, घरफोडी, व्यक्ती हरविणे, अपहरण झालेली, हरवलेली व्यक्ती शोधण्यासाठी श्वानांची मदत होते. तसेच, कोकेन, गांजा, अफू अंमली पदार्थ हुंगण्याचे प्रशिक्षण मिळाल्याने गर्दीच्या ठिकाणी, व्हीआयपी व्यक्तींच्या गाडीत, जमिनीतील पुरलेली स्फोटके शोधण्यासाठीदेखील श्वानपथक उपयोगी ठरते. एका श्वानासाठी दोन प्रशिक्षित कर्मचारी असतात. राज्यात सुमारे 385 ते 400 श्वान पोलिस दलात कार्यरत आहेत. लॅब—ाडोर, जर्मन शेफर्ड, डॉबर मॅन, बेल्जियम शेफर्ड या श्वानांचा पोलिस दलात सहभाग असतो. यातील बेल्जियम शेफर्ड हे सर्वात महाग आणि चपळ श्वान समजले जाते.

पोलिस दलात श्वानाची अशी होते एंट्री

पोलिस दलात एखाद्या श्वानाला दाखल करण्यासाठी दीड ते 2 महिन्यांचे पिल्लू घेतले जाते. श्वानाचे आयुर्मान साधारण 14 वर्ष इतके असते. पोलिस दलात कार्यरत असलेले श्वान दहा वर्षात निवृत्त होतात. श्वान अनफिट असल्यास कधीही निवृत्त करण्यात येते.

सिम्बा 8 तर, जेम्स 5 वर्षांचा

सिम्बाचे वय 8 वर्ष असून तो गुन्हेविषयक कामकाज करणार आहे. तर, जेम्सचे वय 5 वर्ष इतके असून स्फोटकांविषयी काम पाहणार आहे. सिम्बाचे प्रशिक्षण राजस्थान येथे झाले आहे. तर, जेम्सचे प्रशिक्षण हरियाणा येथे झाले आहे.

काय आहे टीम के 9 ?

श्वानांच्या जबड्यातील दोन दातांच्या सुळ्यांना के 9 म्हणून संबोधतात. अमेरिकेतील श्वानांना प्रशिक्षण देणारी जगविख्यात संस्था आहे. या संस्थेत श्वानांना 181 प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. त्या संस्थेच्या नावावरून पुण्यातील श्वानांच्या टीमला के 9 असे नाव देणार आले होते. या टीममध्ये जेम्स, प्रिन्स, बादल, वीरू, रुद्र, लिओ, सिम्बा, रॅम्बो आणि जॅक असे नऊ श्वान होते. यातील जेम्स आणि सिम्बाची पिंपरी- चिंचवडमध्ये बदली करण्यात आली आहे.

सिम्बा आणि जेम्सवर मोठी जबाबदारी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीला शहरातील गर्दीच्या ठिकाणांची बॉम्बशोधक-नाशक आणि श्वानपथकाकडून तपासणी करावी, असे आदेश महासंचालक कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार, आता संशयित ठिकाणची तपासणी करण्याची मोठी जबाबदारी सिम्बा आणि जेम्सवर असणार आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news