

पुणे : पुणे शहराबरोबर पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात शनिवारी पहाटेपासून ते सकाळपर्यंत मुसळधार पावसाने हजेरी लावली. मात्र, त्यानंतर दिवसभर सर्वच भागांत ढगाळ वातावरणाबरोबरच हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. दरम्यान, पुढील 3 ऑक्टोबरला घाटमाथ्यावर काही भागांत मुसळधार पाऊस तर उर्वरित भागांत ढगाळ वातावरण राहून हलका ते मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.(Latest Pune News)
पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभर जोरदार उन्हाचा तडाखा बसला होता. मात्र, संध्याकाळच्या दरम्यान थंड वारे सुटून रात्री उशिरा म्हणजेच अंदाजे दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली. पावसाचा जोर एवढा जबरदस्त होता, त्यामुळे अनेक नागरिकांची चांगलीच झोप उडाली.
दरम्यान, शनिवारी सकाळी सहा वाजल्यानंतर पाऊस उघडण्यास सुरुवात झाली. त्यानंतर दिवसभर ढगाळ वातावरण राहून अधूनमधून हलक्या पावसाच्या सरी पडल्या. पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, 3 ऑक्टोबरपर्यंत घाटमाथ्यावर काही भागांत मुसळधार, तर शहर व जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहील.
दिवसभर पडलेला पाऊस असा (मि. मी.)
माळीण - 2.5, निमगिरी - 1.5, बारामती - 1.2, पाषाण - 1, दौंड - 1, चिंचवड - 0.5, शिवाजीनगर - 0.4, हवेली - 7, तळेगाव - 7, दापोडी - 6, राजगुरुनगर - 3.