

खेड शिवापूर: शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत असलेल्या जुन्या कात्रज घाटात बेकायदा कचरा टाकला जात आहे. या अनधिकृत कचरा डेपोमुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला बाधा निर्माण झाली आहे. केमिकलमिश्रित कचरा जाळल्याने होणाऱ्या धुरामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
कात्रज बोगद्याशेजारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या जागेत शिंदेवाडी ग्रामपंचायतीकडून घरगुती कचरा टाकला जात होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहरातून मोठ्या प्रमाणामध्ये रसायनमिश्रित कचरा, त्यासोबतच बायो वेस्टेजच्या गाड्या या भागामध्ये खाली होऊ लागल्या आहेत. कालांतरानंतर टाकला जाणारा कचरा हा जाळला जात आहे. (Latest Pune News)
केमिकलमिश्रित कचरा व बायोवेस्टेज मिश्रित कचरा जळाल्यानंतर निर्माण होणाऱ्या धुरामुळे मोठ्या प्रमाणावर श्वसनाचे आजार स्थानिक नागरिकांना होऊ लागले आहेत. कचरा डेपोच्या शेजारून वाहणाऱ्या ओढ्यात कचरा मिसळला जात असल्याने विहिरी व कूपनलिकेचे पाणीही दूषित झाले आहे. त्यामुळेही स्थानिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.
ग्रामपंचायत शिंदेवाडीने वेळोवेळी संबंधित प्रशासनातील अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला आहे. एवढ्या गंभीर प्रकरणाची दखल प्रशासनाकडून घेतली जात नसल्याची तक्रार ग््राामस्थ करीत आहेत.
हा प्रकार बंद न झाल्यास शिंदेवाडी ग्रामस्थांमार्फत आंदोलन करण्यात येईल, असे सरपंच रोहिणी मारुती गोगावलेयांनी सांगितले. या वेळी ग्रा. पं. सदस्य शारदा शिंदे, मयूर गोगावले, दत्तात्रय शिंदे, ॲड. यशवंत शिंदे, वेळूचे महसूल अधिकारी सतीश काशीद आणि शिंदेवाडी गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेली चार वर्षांपासून शिंदेवाडी ग्रामपंचायतीमार्फत प्रशासनाला पत्रव्यवहार झाला आहे. याबाबत कुठल्याही प्रकारची दखल प्रशासनाने घेतली नाही, हे दुर्दैव आहे.
- अरविंद शिंदे, माजी सरपंच, शिंदेवाडी.