

Pune Traffic Update Bhide Bridge Shutdown Date
पुणे : पुणे मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून या टप्प्यातील सर्व स्थानके ही प्रवासासाठी खुली करण्यात आली आहेत. प्रवाशांना मेट्रो स्थानकात येण्यासाठी पुणे मेट्रो तर्फे विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणून वनात ते रामवाडी या मार्गीकेतील छत्रपती संभाजी उद्यान व डेक्कन जिमखाना या मेट्रोस्थानकांना पुण्याच्या मध्यवर्ती पेठ भागाशी जोडण्याकरिता पादचारी पूल बांधण्यात येत आहेत. छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्थानकाला पेठ भागाशी जोडणाऱ्या पुलाचे कामे अंतिम टप्प्यात आले असून हा पूल लवकरच खुला होणार आहे, तर डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकाला पेठ भागाशी जोडणाऱ्या पादचारी पुलाचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे.
डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकाला जोडणारा पादचारी पूल हा मुळा नदीवरील भिडे पूल या पुलाच्या वर बांधण्यात येत आहे. या पादचारी पूलामुळे नारायण पेठ, शनिवार पेठ, आणि लक्ष्मी रस्ता येथील नागरिकांना व या भागात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना डेक्कन मेट्रो स्थानकात ये-जा करणे अतिशय सोपे होणार आहे. या पादचारी पुलाचे काम सुरू करण्यात आल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने भिडे पूल हा रविवार, दिनांक २० एप्रिल २०२५ रात्री १२ वाजेपासून (सोमवारी पहाटेचे १२ वाजेपासून) ते दिनांक ६ जून २०२५ असा पुढील दीड महिना वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. नदीचा रस्ता हा वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला असेल.
पुढील दीड महिन्याच्या काळात भिडे पूल बंद असताना नागरिकांनी लकडी पूल, बालगंधर्व पूल व झेड ब्रिज या पूलांचा वापर वापर करून मेट्रो प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पुणे मेट्रो तर्फे करण्यात आले आहे. डेक्कन जिमखाना स्थानकाला जोडणाऱ्या पादचारी पुलाचे काम पुणे मेट्रो तर्फे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. तरी तोपर्यंत नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा ही विनंती.पुणेकरांना होणाऱ्या त्रासासाठी पुणे मेट्रो दिलगीर आहे.