Pune Politics: पुण्यात काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का बसणार? संग्राम थोपटे भाजपच्या वाटेवर

कार्यकर्त्यांकडून चाचपणी; भाजपच्या बड्या नेत्यांशी भेट
Pune Politics
पुण्यात काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का बसणार? संग्राम थोपटे भाजपच्या वाटेवरPudhari
Published on
Updated on

Sangram Thopte to leave Congress and join BJP

भोर/सारोळा: काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत माजी आमदार संग्राम थोपटे कार्यकर्त्यांशी चर्चा करून भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भोर-वेल्हा-मुळशी तालुक्यांतील राजकीय क्षेत्रात थोपटे यांच्या भाजप प्रवेशावरून उलट-सुलट चर्चा होत आहेत.

संग्राम थोपटे हे भाजपच्या वाटेवर असल्याचे वृत्त वार्‍यासारखे पसरले. गुरुवारी (दि. 17) राजगड (वेल्हे) तालुक्यातील कार्यकर्त्यांसोबत बैठका घेऊन भाजपमध्ये जाण्यासाठी कार्यकर्त्यांचे मत घेण्याचे काम संग्राम थोपटे करत आहेत. रविवारी (दि. 20) भोर येथील अनंतराव थोपटे महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये भोरच्या कार्यकर्त्यांसमवेत थोपटे बैठक घेणार आहेत.

त्यानंतर मंगळवारी (दि. 22) मुंबई येथे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार असल्याची माहिती मिळत आहे. विधानसभा निवडणुकीत थोपटे यांना पराभवास सामोरे जावे लागले आहे. थोपटे हे तीनवेळा आमदार झाले.

मात्र, काँग्रेसची सत्ता असतानाही पक्षश्रेष्ठींनी त्यांना मंत्रिपदावरून डावलले. विधानसभा निवडणुकीतील पराभव संग्राम थोपटे यांच्या जिव्हारी लागला आहे त्यातूनच त्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे ठरवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, केंद्रीय मंत्री अमित शाह यांचीही भेट थोपटे यांनी घेतल्याची माहिती आहे.

थोपटे यांच्या भाजप प्रवेशाने भोर, वेल्हे आणि मुळशी तालुक्यांच्या विकासाला गती मिळण्याबरोबरच राजगड सहकारी साखर कारखान्यापुढील प्रश्न सुटण्यास मदत होईल, असे थोपटे समर्थकांचे म्हणणे आहे. राजगड कारखाना आणि इतर संस्थांना अडचणी भेडसावत असल्यामुळे भाजप नेत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न थोपटे यांनी सुरू केला होतात.

भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने तसेच दौंडचे आमदार राहुल कुल व जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मध्यस्थीने अनेक नेत्यांच्या भेटीगाठी व दिल्लीवारी झाल्यावर थोपटे यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरल्याची चर्चा आहे. विधानसभा पराभवानंतर थोपटे राजकीय अस्तित्व टिकून ठेवण्याच्या प्रयत्नात होते.

त्यापुर्वी संग्राम थोपटे यांना लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपाने आमंत्रण दिले होते, परंतु त्या वेळी राजकारणाचा अंदाज न आल्याने थोपटे यांनी काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतला होता. विधानसभा निवडणुकामध्ये काँग्रेस पक्षासह थोपटे यांचाही मोठा पराभव झाला आहे. त्यामुळे सत्तेशिवाय शहाणपण नसते या उक्तीप्रमाणे थोपटे यांनी राजकीय वळण घेतल्याची चर्चा सुरू आहे.

दैनंदिन घडामोडी, संस्थाच्या वित्तीय अडचणी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तिरक्या चालीमुळे सतत असलेली चौकशीची टांगती तलवार यामुळे थोपटे यांनी भाजपात जाण्याचा निर्णय अखेर घेतल्याची चर्चा सुरू आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गट व शिवसेना शिंदे गटातील भोर-वेल्हे-मुळशी तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत. त्यामुळे आपल्या समूहाचे राजकीय बस्तान त्यांच्याशी जुळणार का, या सर्व बाबींची चाचपणी करूनच गेले दोन ते तीन महिने भाजप प्रवेशासाठी ’वेटिंग’वर असलेल्या थोपटे यांना आता दिलासा मिळाला आहे.

माजी आमदार संग्राम थोपटे यांनी सध्या तरी कोणत्याही राजकीय पदाची अपेक्षा भाजपकडून ठेवलेली नसल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र, आगामी काळात थोपटे यांना विधानपरिषद अथवा महामंडळाचे पद देऊन जिल्हा भाजपला ताकद दिली जाणार असल्याने थोपटे यांना भाजपात जाण्यासाठी मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. आता तरी राजगड कारखाना व भोरच्या विकासात भर पडेल अशी सर्वसामान्याची चर्चा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news