

Rupali Chakankar news
पुणे: ‘महाराष्ट्र राज्य महिला आयोगा’च्या ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पुणे जिल्हा दौरा करत सलग तीन दिवस घेतलेल्या जनसुनावणीत जिल्ह्यातील 305 तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली. सर्व यंत्रणेनिशी जात महिलांना त्यांच्याच जिल्ह्यात न्याय देण्याची भूमिका असल्याचे चाकणकर यांनी सांगितले.
राज्य महिला आयोगाच्या वतीने 15 ते 17 एप्रिल या काळात पुणे जिल्ह्याचा दौरा करण्यात आला. भौगोलिकदृष्ट्या जिल्हा मोठा असल्याने मंगळवारी (दि. 15) पुणे शहराकरता सुनावणी घेण्यात आली. या वेळी 123 तक्रारीवर कार्यवाही करण्यात आली.
बुधवारी (दि. 16) पुणे ग्रामीणकरिता झालेल्या सुनावणीमध्ये 87 तक्रारी आल्या. काल गुरुवारी (दि. 17) पिंपरी चिंचवडकरिता झालेल्या सुनावणीमध्ये 95 तक्रारींवर कारवाई करण्यात आली. गेल्या तीन दिवसांत एकूण 305 तक्रारींवर कारवाई करण्यात आली आहे. आयोगाच्या अध्यक्षासह सदस्य सचिव नंदिनी आवडे या दौर्यात सहभागी झाल्या होत्या.
याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर म्हणाल्या, आयोगाचे मुख्यालय मुंबईत आहे. राज्यातील काना-कोपर्यातल्या महिलांना मुंबईत येणे शक्य होत नाही. तेव्हा त्यांच्या तक्रारी ऐकण्यासाठी, मदत करण्यासाठी आयोगच जिल्हास्तरावर जात असतो. जनसुनावणीला माझ्यासह जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, विधी सेवा अधिकारी अशी विविध यंत्रणा उपस्थित राहत असल्याने महिलांना त्याच ठिकाणी मदत दिली जाते.
गेल्या तीन दिवसांत पुणे जिल्ह्यात समोर आलेल्या तक्रारीमध्ये कौटुंबिक कलह, वादच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर समोर आल्या. त्यानंतर कामाच्या ठिकाणी त्रास, आर्थिक फसवणूक अशा तक्रारी होत्या. महिला, पती तसेच कुटुंबाचे समुपदेशन करत तुटण्याच्या मार्गावर असलेले संसार पुन्हा जोडण्यावर आयोगाचा भर असतो. या व्यतिरिक्त महिलांना कायदेशीर सल्ला, पोलिसांची तातडीने मदत मिळवून देत आलेल्या महिलेला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येतो, असे त्यांनी सांगितले.
‘महिला आयोग आपल्या दारी’ अंतर्गत जनसुनावणी नंतर जिल्ह्याची आढावा बैठक घेतली जाते. महिलांचे प्रश्न, त्या सोडविण्यासाठी करण्यात येणार्या उपाययोजना, महिलांसाठी राबविण्यात येणार्या योजनाची अंमलबजावणी याचा आढावा प्रशासन, पोलिस, कामगार, आरोग्य, शिक्षण, परिवहन आदी विभागांकडून घेत आवश्यकतेनुसार निर्देश आयोगामार्फत देण्यात येतात.
पुण्यात घेतलेल्या आढावा
बैठकीत धर्मादाय रुग्णालयांनी तसे फलक दर्शनी भागात लावावे, कामाच्या ठिकाणी अंतर्गत समितीची स्थापना, बालविवाह रोखण्यासाठी उपाययोजना, शाळांमध्ये दामिनी पथकाने सतत भेटी देत राहणे असे निर्देश आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी संबंधित विभागांना दिले आहेत.