जंकफूडमध्ये हरवतो आहे विद्यार्थी ; जागृती करण्यात शाळा-महाविद्यालयांना अपयश

जंकफूडमध्ये हरवतो आहे विद्यार्थी ; जागृती करण्यात शाळा-महाविद्यालयांना अपयश

पुणे : माझ्या मुलीने खिशातले पैसे चोरून तिच्या मित्र-मैत्रिणींना पिझ्झा, बर्गरची पार्टी दिली. शालेय परिसरात जंकफूडची विक्री करू नये, असा नियम असतानादेखील शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात संबंधित पदार्थांची विक्री केली जाते. यासंदर्भात शालेय व्यवस्थापनाकडे दाद मागितली. मात्र त्यांनी पालकांनीच मुलांवर संस्कार करण्याची शिकवण दिल्याचा धक्कादायक प्रकार एका पालकाने सांगितला. असे प्रकार अनेक शाळांमध्ये सर्रास घडताना दिसत आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थी जंकफूडच्या विळख्यात अडकल्याचे स्पष्ट झाले आहे.

संबंधित वाचा :

विद्यार्थ्यांच्या आरोग्यास अपायकारक असलेले जंकफूड महाविद्यालये व विद्यापीठांच्या परिसरातून हद्दपार करण्याचे आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशभरातील सर्व विद्यापीठांना दिले आहेत, तर 8 मे 2017 रोजी महाराष्ट्रातही शिक्षण विभागाने आदेश काढून सर्व शाळांच्या उपाहारगृहांमध्ये जंकफूडला बंदी घातली आहे. या नियमाचे उल्लंघन झाल्यास मुख्याध्यापक आणि शाळा जबाबदार राहील, असेही त्यात नमूद आहे. जंकफूडऐवजी इडली, सांबर, पोळी, पुलाव, नारळाचे पाणी, जलजिरा आदी 20 पदार्थांच्या विक्रीची मुभा देण्यात आली आहे. याशिवाय जंकफूडचे तोटे व पोषक पदार्थांचे सेवन केल्याने होणार्‍या फायद्यांविषयी जागृती विद्यार्थ्यांमध्ये करण्याची जबाबदारीही शाळा प्रशासनावर टाकण्यात आली आहे. परंतु, जंकफूडच्या विक्रीतून मोठ्या प्रमाणात नफा मिळत असल्यामुळे पदार्थ विक्रेत्यांचा कल जंकफूडच्या विक्रीकडेच जास्त असतो, तर शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात जे कॅन्टीनचालक असतात ते शाळा प्रशासनाला मॅनेज करतात. त्यामुळे या प्रकाराला त्यांचीदेखील मूकसंमती असल्याचे दिसून येते. याकडे अन्न व औषध विभाग आणि शिक्षण विभागाने गांभीर्याने पाहून जंकफूड विक्रेत्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

जंकफूडमुळे अनेक दुष्परिणामांची भीती…
शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात जंकफूड विक्रीचे हातगाडे जागोजागी उभे असल्याचे दिसतात. मग शहरी भाग असो की ग्रामीण. परिणामी, शहरांसह ग्रामीण भागातील मुलांचा ओढा जंकफूड खाण्याकडे वाढत आहे. मात्र, त्याचे दुष्परिणाम सध्या प्रचंड वेगाने दिसून येत आहेत. अपचन, हिमोग्लोबिनची कमतरता, चरबी वाढणे, तणाव, नैराश्य येणे, पोटाचे विकार वाढणे, यांसह चव येण्यासाठी वापरल्या जाणार्‍या अजिनोमोटो, टेस्ट पावडरमुळे कर्करोगाची भीती उद्भवते तसेच स्मरणशक्तीवर परिणाम होतो.

या पदार्थांवर हवी शालेय परिसरात बंदी…
चिप्स, तळलेले पदार्थ, सरबत, बर्फाचा गोळा, शर्करायुक्त कार्बोनेटेड आणि नॉन-कार्बोनेटेड शीतपेये, रसगुल्ला, गुलाबजाम, पेढा, कलाकंद, नूडल्स, पिझ्झा, बर्गर, टिक्का, पाणीपुरी. सर्व प्रकारच्या चघळण्याच्या गोड गोळ्या, तीस टक्क्यांपेक्षा अधिक शर्करायुक्त पदार्थ, सर्व प्रकारच् चॉकलेट, सर्व प्रकारची मिठाई.

महाविद्यालये किंवा विद्यापीठात शिकणार्‍या मुलांना कोणते पदार्थ खावेत आणि कोणते खाऊ नयेत, याची जाणीव असते. परंतु, लहान मुलांना यासंदर्भात समजत नाही तसेच ही मुले हट्टी असतात. त्यामुळे किमान शालेय परिसरात तरी जंकफूडच्या विक्रीला कोणत्याही परिस्थितीत परवानगी देण्यात येऊ नये तसेच अशी विक्री झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी; अन्यथा या जंकफूडमुळे अनेक पिढ्या बरबाद झाल्याचे पाहायला मिळेल.
                                                                              – एक पालक

 शाळा-महाविद्यालयांमध्ये जंकफूडची विक्री न करता भारतीय पदार्थांची विक्री केली जावी. यासाठी शाळा-महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांची एक बैठक घेऊन त्यांची अन्न व औषध विभागाच्या प्रशासनामार्फत जागृती करण्यात येईल. त्यासाठी आवश्यकता असेल तर आरोग्यासाठी कोणते अन्न गरजेचे आहे, हे सांगणार्‍या तज्ज्ञांना मुख्याध्यापक आणि शिक्षकांना संबोधित करण्यासाठी बोलविले जाईल.
                                                   – सुरेश अण्णापुरे, सहआयुक्त, अन्न विभाग

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news