डॉक्टरांची 60 टक्के पदे रिक्त ; राज्यातील शासकीय रुग्णालयांतील स्थिती | पुढारी

डॉक्टरांची 60 टक्के पदे रिक्त ; राज्यातील शासकीय रुग्णालयांतील स्थिती

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ आणि सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या 60 टक्क्यांपेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. डॉक्टरांना शासकीय रुग्णालयांमध्ये मनाजोगे वेतन मिळत नसल्याने त्यांनी खासगी रुग्णालयांमध्ये रुजू होणे पसंत केल्याचे चित्र आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार घेणार्‍या रुग्णांच्या उपचारांवर परिणाम होत आहे. खासगी रुग्णालयांचे जाळे दिवसेंदिवस विस्तारत आहे आणि उपचार महागडे होत आहेत. अवयव प्रत्यारोपणापासून ते आयव्हीएफ, न्यूरोलॉजिकल केअर, ऑर्थोपेडिक शस्त्रक्रियांपर्यंत अशा सर्व उपचारांचा खर्च कित्येक लाखांच्या घरात जातो. खासगी रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी अवाच्या सवा पैसे आकारले जातात. डॉक्टरांच्या उपलब्धतेअभावी शासकीय रुग्णालयांमध्ये यापैकी कितीतरी उपचार गरजू रुग्णांना उपलब्ध होत नाहीत.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, वर्ग-1 तज्ज्ञांच्या सुमारे 61% जागा रिक्त आहेत. यामध्ये विशेषतः दंतवैद्य, सुपर स्पेशालिटी डॉक्टर, मानसोपचारतज्ज्ञ आदींचा समावेश आहे. पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या तुलनेत राज्याच्या ग्रामीण आणि अंतर्गत भागात रिक्त पदांची संख्या जास्त आहे. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वाढ होऊनही सार्वजनिक क्षेत्रातील मनुष्यबळाचा तुटवडा कायम आहे, याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या आरोग्यावर होत आहे.
शासकीय रुग्णालयांमध्ये 50% पेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. पदे भरण्यासाठी वारंवार जाहिराती दिल्या जातात. गरज भासल्यास वेतनश्रेणी वाढवण्याचीही राज्य शासनाची तयारी आहे. मात्र, स्पेशालिस्ट डॉक्टरांचा प्रतिसाद कमी आहे. 
                                                                           – धीरज कुमार, राज्याचे आरोग्य सेवा आयुक्त. 
हे ही वाचा : 

Back to top button