दौंड: दौंड शहरात कचरा उचलण्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दौंड नगरपालिकेने दोन निविदा प्रसिद्ध केल्या. पहिल्या निविदेमध्ये शहरातील कचरा उचलण्याचे काम भाग्यदीप वेस्ट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला मिळाले होते.
परंतु ठेकेदाराने सुरक्षा ठेव वेळेत न भरल्याने ही निविदा रद्द करण्यात आली. त्यानंतर नगरपालिकेने पुन्हा दुसरी निविदा प्रसिद्ध केली. त्याची प्रक्रिया सोमवारी (दि. 28) पूर्ण होणे गरजेचे होते, परंतु दौंड नगरपालिकेत मुख्याधिकारी नसल्याने ती प्रक्रिया बारगळल्याने शहरातील कचऱ्याचा प्रश्न ’जैसे थे’ राहिला आहे. (latest pune news)
दौंड नगरपालिकेत काही ठरावीक ठेकेदारांचा मनमानी कारभार आहे, हे सर्व दौंडकरांना माहिती आहे. यातच काही दिवसांपूर्वी ही निविदा मिळविण्याकरता बड्या नेत्यांच्या बगलबच्चांनी आपली ताकद पणाला लावली आहे.
दौंड नगरपालिकेत साडेचार वर्षांत पाच मुख्याधिकारी झाले. निर्मला राशिनकर यांचा कार्यकाल पूर्ण झाला तर बाकी इतर चार जणांचे कार्यकाल पूर्ण झालेच नाहीत. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे नगरपालिकेच्या कामकाजामध्ये राजकीय नेत्यांची ढवळाढवळ होय. हे मुख्याधिकारी मेटाकुटीला आले होते, हे आता दौंडकरांच्या लक्षात आले आहे.
या कचरा निविदेची मुदत 31 जानेवारी रोजी संपली होती. नगरपालिका प्रशासनाने मुदत संपण्याआधीच पूर्वतयारी करणे गरजेचे होते, परंतु काही लोकांचे हित जपण्यासाठी व राजकीय दबाव आल्यामुळे या कामांमध्ये चालढकल केली असल्याचे बोलले जात आहे.
दुसर्यांदा नगरपालिकेने फेरनिविदा काढल्यानंतर ती मिळवण्याकरता राजकीय नेत्यांकडे त्यांच्या बगलबच्चांनी पायघड्या टाकल्या. तसेच ज्यांची निविदा नाकारली होती, त्यांनीदेखील निविदा भरली असल्याने यशश्री एंटरप्राइजेस या कंपनीने हरकत घेतली आहे.
ही निविदा फेटाळण्यात यावी, असे लेखी पत्र दौंड नगरपालिकेला दिले आहे. त्यातच शहरातील कचरा उचलण्याची निविदा मागील तीन-चार वर्षांपूर्वी 8 ते 9 लाख रुपये इतकी होती. ही निविदा चार-पाच वर्षांत जवळपास दीड कोटीच्या आसपास कशी गेली याची देखील जिल्हाधिकार्यांनी चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
दौंड शहरात पूर्वी ज्याप्रमाणे कचरा उचलण्यासाठी असलेल्या निविदेची रक्कम कोणी वाढवली, शहरात तेवढीच लोकसंख्या आहे, तेवढाच कचरा जमा होत आहे मग अचानक या कचर्याच्या निविदेमध्ये एवढा मोठा घोळ कसा काय असा सवाल दौंड शहरात नागरिक करू लागले असून, याची चौकशी होणे गरजेचे आहे.