आंदोलनाशिवाय पाणीच द्यायचे नाही का? शेतकरी आक्रमक

आंदोलनाशिवाय पाणीच द्यायचे नाही का? शेतकरी आक्रमक

दिवे : पुढारी वृत्तसेवा : दिवे (ता. पुरंदर) परिसरात दुष्काळी स्थिती आहे. परिसरात दिवसभर कडक ऊन आणि वारे वाहत आहेत. त्यामुळे फळबागांना आता पाण्याची नितांत गरज आहे. काही शेतकर्‍यांनी दोन महिन्यांपूर्वी पैसे भरले आहेत, तरीदेखील त्यांना पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी मिळालेले नाही. त्यामुळे आंदोलन केल्याशिवाय पाणीच द्यायचे नाही का? असा सवाल करत शुक्रवारी (दि. 31) योजनेच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढणार असल्याचा इशारा दिवेतील शेतकर्‍यांनी जलसंपदा विभागाला दिला आहे.

दिवेसह काळेवाडी, जाधववाडी, कोल्हेवस्ती, सोनोरी परिसरात पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे एक आवर्तन सोडणे फार गरजेचे आहे. मात्र ते सोडण्यासाठी अधिकारी टाळाटाळ करत आहेत. मात्र पूर्वेकडील परिसरात अहोरात्र पाणी सुरू आहे. वाघापूर पंपहाऊसवर शेतकर्‍यांसोबत पाहणी केली असता नदीवरील तीन पंपापैकी केवळ एकच पंप सुरू असल्याचे समजले.

तर हा पंपही नादुरुस्त झाला होता, तो दुरुस्त केला आहे, परंतु पंपहाऊसची रंगरंगोटी व फरशीचे काम सुरू आहे. फरशी पॉलीश करायची असल्याने त्यावर रबरी मॅट टाकता येत नाही या कारणांमुळे दिवे लाइन सुरू करता येत नाही, असे अजब कारण काही जबाबदार व्यक्तीने दिले आहे.

त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत प्रशासन किती गंभीर आहे, याची प्रचिती शेतकर्‍यांना आली. वास्तविक जुनी फरशी उचकटून नवीन फरशी का बसविण्यात आली हे मात्र गुलदस्त्यात आहे. बाहेरून रंगरंगोटी करण्यापेक्षा आतील पंपांची दुरुस्ती तेवढ्याच तत्परतेने केली असती तर शेतकर्‍यांना वेळेवर पाणी देता आले असते.

याबाबत वरिष्ठ पातळीवर संपर्क साधला असता उत्तर मिळाले नाही. दिवे परिसरातील शेतकर्‍यांचा मात्र आता संयम सुटला आहे. लवकरात लवकर पाणी सोडले नाही तर शुक्रवारी पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या कार्यालयात धडक मारणार असल्याचे मुरलीधर झेंडे व इतर शेतकर्‍यांनी सांगितले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news