

प्रसाद जगताप
पुणे : पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकी, तीनचाकी वाहनांना परवानगी नसतानाही बहुतांश दुचाकी वाहनचालक बिनधास्तपणे या मार्गावर घुसखोरी करत असल्याचे पाहणीदरम्यान समोर आले आहे. यामुळे येथे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
पुणे-मुंबई प्रवास कमी वेळेत व्हावा, यासाठी शासनाने पुणे-मुंबई-एक्स्प्रेस वेची निर्मिती केली. सुमारे 94 किलोमीटर लांबीचा हा एक्सप्रेस वे असून, यात फक्त चारचाकी आणि अवजड वाहनांनाच प्रवेश करण्याची परवानगी आहे. मात्र, दुचाकीस्वारांची या एक्स्प्रेस वेवर मोठी घुसखोरी होत असल्याचे दै.'पुढारी'ने केलेल्या पाहणीदरम्यान समोर आले आहे.
घुसखोर दुचाकीस्वारांना रोखण्यासाठी 'एक्स्प्रेस वे'च्या सुरुवातीलाच असलेल्या एन्ट्री पॉइंटवर महामार्ग पोलिसांचे पथक असणे आवश्यक आहे. मात्र, असे कोणतेही पथक एन्ट्री पॉइंटला नसल्याचे दिसले. त्याचाच फायदा घेत आणि माहिती नसल्यामुळे काही दुचाकीस्वारांनी 'एक्स्प्रेस वे'वर एन्ट्री घेतल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढू शकते.
दै. 'पुढारी'च्या वतीने शनिवारी करण्यात आलेल्या पाहणीदरम्यान वाहचालकांकडून नियमांची ऐशीतैशी करण्यात येत असल्याचे पाहायला मिळाले. यात 'एक्स्प्रेस वे'ला परवानगी नसतानाही दुचाकीस्वारांची घुसखोरी होत असल्याचे दिसले, तर दुचाकींसह चारचाकी चालकदेखील राँग साइडने ये-जा करत असल्याचे पाहायला मिळाले. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. मात्र, महामार्ग पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसले.
एक्स्प्रेस वेवर दुचाकी, तीनचाकी वाहनचालकांना येण्यास बंदी आहे. आम्ही सातत्याने कारवाई करत असतो. आणखी कारवाई कडक करण्यात येईल; तसेच दुचाकीस्वारांनी एक्स्प्रेस वेवर येऊ नये, याचीही खबरदारी घेण्यात येईल.
– संजय जाधव, पोलिस अधीक्षक, महामार्ग