इंदापूर, पुढारी वृत्तसेवा : न्यायालयाने निर्णय दिलाय त्याबद्दल बोलणे योग्य नाही. कोणतेही कारण न देता ईडीसारखी संस्था राज्यातील मंत्र्यांना घेऊन जाते आणि अटक दाखवते. वेगवेगळ्या अतिरेकी संघटनांचा उल्लेख करण्याचा प्रयत्न केसमध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे. विरोधकांना नामोहरम करण्याचा प्रयत्न आहे. ज्यांनी ही जमीन विकली आहे, त्यांच्यावर कारवाई न करता ज्यांनी घेतली आहे, त्यांच्यावर कारवाई होतेय. कुणाला तरी अटक झाली की आनंदोत्सव केला जातोय. राजकारण कोणत्या दिशेनं चाललं आहे, हे दिसत आहे, असे राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेवर म्हटले आहे.
इंदापूर शहरात राष्ट्रवादी परिवार संवाद मेळाव्यात ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, दशरथ माने, सक्षणा सलगर, रविकांत वरपे, प्रताप पाटील, हनुमंत कोकाटे, अभिजीत तांबिले, छाया पडसळकर यांच्यासह पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इंदापूर भागातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी भीमा खोऱ्यातील सर्व बाबींचा सर्वंकष अभ्यास सुरू केला आहे. पश्चिमेकडून वाहून जाणारे पाणी वळवण्यासाठी काही प्रकल्प राबवले जात आहेत. पाणी जास्त उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नाची शिकस्त नुसतीच भाषणात न करता त्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले; मात्र, विधानसभेला राज्यमंत्री भरणे यांना जे तीन हजाराचे मताधिक्य आहे. ते ३० हजारावर नेण्यासाठी प्रयत्न करा, तुमची म्हणाल ती सेवा करायला मी तयार आहे, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना माझे दोन प्रश्न आहेत, विरोधात असले की चौकशी लावता आणि तुमच्या पक्षात आले की गायब होते. तुम्ही कोणते औषध वापरतात ते सांगा, असे म्हणत महाराष्ट्र खूप अडचणीतून चालला आहे. असे असले तरी दिल्लीच्या तख्तासमोर मोडेल, पण वाकणार नाही, असा निर्धार खासदार सुळे यांनी केला. ईडीच्या नोटीसा आली की आपली सत्ता येते. कधी-कधी काही लोकांना त्यांची जागा दाखवावी लागते, असे म्हणत 'लढेंगे जरूर और जितेंगे भी जरूर' असे त्या म्हणाल्या. आम्ही पक्ष प्रवेश केल्यामुळे आम्हाला ईडीची काळजी नाही. कारण आम्ही भाजपमध्ये गेलो आहोत, असे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काही दिवसांपूर्वी भाषणात सांगितले होते. याचा उल्लेख करत त्यांनी पाटील यांच्यावर टीका केली.
यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जलसंपदा मंत्री पाटील यांना इंदापूर तालुक्यातील प्रलंबित पाणी प्रश्न सोडविण्याची मागणी करत आम्हाला कोणाच्या हक्काचे किंवा वाटणीचे पाणी नको आम्हाला आमचं पाणी द्या. खडकवासला, निरा डावा कालव्याचे पाणी आम्हाला मिळेल, अशी योजना आणा, अशी मागणी भरणे यांनी केली.
हेही वाचलतं का ?