सातारा : पुढारी वृत्तसेवा : सातारा शहर परिसरातील बुधवार नाका ते मोळाचा ओढा मार्गावरील आर्यांग्ल कॉलेजनजीक असलेला अरुंद पूल धोकादायक बनला असून त्याच्या आजूबाजूचा भाग पूर्णपणे खचला व पडलेला आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवास जीवघेणा बनला आहे.
आर्यांग्ल कॉलेजनजीक असलेला हा पूल अरुंद असून या पुलावरील रस्ता खड्डेमय बनला आहे. पुलाशेजारील संरक्षक कठडेही तुटले आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणे धोक्याचे ठरु लागले आहे. सातारा शहरानजीक असलेल्या या अरुंद पूलावरुन दररोज हजारो वाहनांची ये-जा असते. विशेषत: कोंडवे, सैदापूर, मोळाचा ओढा आदी परिसरातील असंख्य विद्यार्थी सातारा शहरातील विविध महाविद्यालये व माध्यमिक तसेच प्राथमिक शिक्षणासाठी ये-जा करत असतात.
त्यांच्यासाठी हा मार्ग सोयीचा असल्याने या मार्गाचा अधिक वापर होत आहे. तरी हा पूल पाडून त्याठिकाणी मोठा व रुंद पूल उभारावा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांमधून होत आहे. याबाबत अनेकदा आवाज उठवूनही या विषयाकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. या पूलावरुन जाणार्या वाहनांची वाढती संख्या पाहता सुरक्षेची उपाययोजना वेळीच होणे गरजेचे आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने याबाबत कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.
हेही वाचलंत का?
मोळाचा ओढा परिसरात उद्योग, व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्याने या अरुंद पुलावरुन अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. विशेषत: पत्रा, स्टील, लोखंडांनी भरलेली अवजड वाहने या पुलावरुन जातात. त्यामुळे दुर्घटना घडण्याचा धोका अधिक वाढला आहे. तरी तातडीने उपाययोजना राबवावी.
– श्रीरंग काटेकर, सातारा