पुणे : इंदापूर शहरात गारटकर-शहा यांच्यात पुन्हा रंगणार लढत

Nagar palika election logo
Nagar palika election logo
Published on
Updated on

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा

इंदापूर नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर व विद्यमान नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा अशीच वर्चस्ववादाची लढत पुन्हा होणार आहे. शहा व गारटकर यांना त्यांचे वरिष्ठ नेते किती ताकद पुरविणार, याचीच चर्चा निवडणुकीच्या निमित्ताने शहरात सुरू झाली आहे.

Bharne-Harshwardhan
Bharne-Harshwardhan

नगरपालिकेवर सध्या माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या गटाच्या नगराध्यक्षा अंकिता शहा जनतेमधून निवडून आल्या आहेत व त्यांच्या विचारांचे आठ नगरसेवक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ नगरसेवक आहेत. जनतेमधून निवडल्या जाणार्‍या नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या पत्नी अनुराधा गारटकर व इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा यांची पत्नी अंकिता शहा यांच्यात थेट लढत झाली होती. इंदापूर शहरावर गारटकर व शहा परिवार यांचा प्रभाव आहे.

विद्यमान नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी नगराध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांना नगरपालिकेतील विविध समस्यांना सामोरे जावे लागले. राज्यातील भाजपचे सरकार गेल्यामुळे विकास निधी आणण्यात अडथळे असताना देखील त्यांनी कोट्यवधीचा निधी शहरासाठी आणला. प्रदीप गारटकर यांच्या पदरी पराभव आला असला, तरी नाउमेद न होता त्यांनी देखील राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार येताच उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सहकार्याने शहरात कोट्यवधी रुपयांचा निधी आणला.

नगरपालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शहरावर लक्ष केंद्रित केले असून, राष्ट्रवादी नगरसेवकांना सातत्याने संपर्क करीत शहरातील दौरे वाढविले आहेत. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी देखील नगरपालिकेत आपली सत्ता अबाधित राहावी, यासाठी जुळवाजुळव करण्यात सुरुवात केली आहे. हे दोन्ही नेते आपल्या गटाची सत्ता नगरपालिकेवर यावी, यासाठी रसद किती पुरवितात, यावरच कोणाची सत्ता येणार, हे ठरणार आहे. नगरपालिकेमध्ये सध्या समसमान नगरसेवक आहेत. प्रभागरचनेत वाढलेले तीन नगरसेवक कोणत्या पक्षाला फायदेशीर ठरतात, हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news