

पुणे : इराणमध्ये सरकारविरोधी आंदोलन तीव्र झाल्याने तेथून आयात होणाऱ्या सफरचंदावर परिणाम झाला आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी झाल्याने इराणी सफरचंदाच्या दरात दहा किलोमागे 150 ते 200 रुपयांनी वाढ झाली आहे.
‘इराणमधून बोटीतून मुंबईत सफरचंदे पाठविली जातात. तेथून पुण्यासह देशभरातील बाजारपेठेत सफरचंदे विक्रीस पाठविली जातात. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील
फळबाजारात गेल्या आठवड्यात आठ ते दहा हजार क्रेटची (प्लास्टिक जाळी) सफरचंदाची आवक झाली होती. सध्या बाजारात चार ते साडेचार हजार क्रेट सफरचंदाची आवक होत असून, मागणीच्या तुलनेत सफरचंदाची आवक कमी होत आहे. मागणी वाढल्याने इराणधील सफरचंदाच्या दरात वाढ झाली आहे,’ अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील सफरचंद व्यापारी श्री गुुरुदेव दत्त एजन्सीचे संचालक सत्यजित सुयोग झेंडे यांनी दिली.
‘इराणी सफरचंदासह अफगाणिस्तानातील सफचंदाच्या मागणीत वाढ झाल्यामुळे अफगाणिस्तानातील सफरचंदाच्या दरात वाढ झाली आहे. दहा किलो इराणी सफरचंदाचे दर 1350 ते 1500 रुपये, अफगाणिस्थानातील दहा किलो सफरचंदाला 900 ते एक हजार रुपये दर मिळाले आहेत. न्यूझीलंडमधील सफरचंदावरील आयात शुल्क 50 टक्क्यांहून 25 टक्के करण्यात आले आहे. पुढील महिन्यात न्यूझीलंडमदील सफरचंदे बाजारात दाखल होतील, असे त्यांनी नमूद केले.
‘काश्मीरमधील सफरचंदे नियंत्रित वातावरणात ठेवली जातात. एक फेब्रुवारीनंतर नियंत्रण वातावरणात (कंट्रोल्ड ॲटमॉस्फीअर) साठवणूक केलेली काश्मिरी सफरचंदे बाजारात विक्रीस पाठविली जातील. न्यूझीलंडमधील सफरचंदाची आवक पुढील महिन्यात होणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मुस्लिम धर्मीयांच्या रमजान महिन्यास प्रारंभ होणार आहे. सध्या बाजारात अफगाणिस्तान, इराणमधील सफरचंदे उपलब्ध आहेत. सफरचंदांना मागणी वाढल्याने दर तेजीत आहेत. रमजान महिन्यात सर्व प्रकारच्या फळांना मागणी वाढणार आहे. काश्मीर, न्यूझीलंडमधील सफरचंदे बाजारात विक्रीस दाखल झाल्यानंतर दरात घट होईल,’ असे सफरचंद व्यापारी सत्यजित सुयोग झेंडे यांनी सांगितले.
इराण - 51 टक्के
अफगाणिस्तान -
आयात शुल्क नाही
तुर्की - 50 टक्के
न्यूझीलंड - 25 टक्के
पोलंड - 50 टक्के
चिली - 51 टक्के
अमेरिका - 50 टक्के
चिली - 51 टक्के
दक्षिण आफ्रिका - 50 टक्के