Sugarcane News : उसाच्या वाहनातच केन सॅम्पलिंग मशीन बसवा; अंकुशची साखर आयुक्तांकडे मागणी

साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना मागण्यांचे निवेदन देताना आंदोलन अंकुशचे शिष्टमंडळ.
साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना मागण्यांचे निवेदन देताना आंदोलन अंकुशचे शिष्टमंडळ.

पुणे; पुढारी वृत्तसेवा : साखर कारखान्यांच्या उसाच्या उतारा चोरीवर अंकुश ठेऊ शकणारे व शेतकर्‍यांच्या उसाचा खरा उतारा दाखवणारे केन सॅम्पलिंग मशीन बसविणे साखर कारखान्यांना सक्तीचे करण्याची मागणी आंदोलन अंकुशच्या शिष्टमंडळाने साखर आयुक्तांकडे केली आहे. साखर संकुल येथे सोमवारी (दि.3) सकाळी साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची आंदोलन अंकुशचे नेते धनाजी चुडमुंगे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट घेत मागण्यांचे निवेदन दिले व संयुक्त चर्चा केली.

त्यावर वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटचा अभिप्राय घेऊन शिफारस करण्याच्या सूचना साखर आयुक्तांनी प्रशासनास दिल्या आहेत. शिष्टमंडळात आंदोलन अंकुश प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी मागणी केल्याचे सांगितले. शिष्टमंडळात दीपक पाटील,दत्तात्रय जगदाळे, बाळासाहेब भोगावे व अमोल माने यांचा समावेश होता.

कृषी मुल्य आयोगाने तशा सूचना सर्व साखर आयुक्तांना 2018-19 मध्येच दिल्या असून यंदाच्या 2023-24 च्या हंगामापासून राज्यात अशा मशीनवर येणार्‍या उतार्‍यानुसार (रिकव्हरी) उसाचा दर शेतकर्‍यांना मिळावा, अशीही मागणी चर्चेत करुन निवेदनात म्हटले आहे की, शेतकरी उच्च उतारा देणार्‍या उसाच्या जातींची लागवड करत असताना व कारखानेही परिपक्व झालेल्या उसाचीच तोड प्राधान्याने करत असताना साखर कारखान्यांचा उतारा वाढण्याऐवजी वर्षाला कमी होत आहे.

केंद्र सरकारने निर्धारित केलेली उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत तथा एफआरपी ही उतार्‍यानुसार ठरविली जाते. उतारा कमी येण्यामुळे शेतकर्‍यांना ऊस शेती तोट्यात करावी लागत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना पारदर्शी पध्दतीने उसाचा उतारा मिळावा, यासाठी केन सॅम्पलर मशीन बसविण्यात यावी. दरम्यान, केन सॅम्पलिंग मशीनला सुमारे दोन ते अडीच कोटी रुपयांचा खर्च येतो. त्यासाठी केंद्राने 75 टक्के अनुदान दिले असून उर्वरित रक्कम कारखान्याने शेतकर्‍यांकडून घेऊन ही मशीन बसवायचे असल्याचे धनाजी चुडमुुंगे यांनी सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news