प्रेरणादायी ! कर्करोगग्रस्तांसाठी तिसर्‍यांदा केशदान

प्रेरणादायी ! कर्करोगग्रस्तांसाठी तिसर्‍यांदा केशदान

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : कर्करोग्रस्त रुग्णांना केमोथेरपीमुळे केस गळण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. अशा परिस्थितीत डोक्यासाठी विग वापरुन त्यांना त्यांचा आत्मविश्वास पुन्हा वाढविता येतो. या रुग्णांना आवश्यक विग बनविण्यास मदत व्हावी, यासाठी थेरगाव-गणेशनगर येथील राहुल सरवदे या तरुणाने तिसर्‍यांदा केशदान केले आहे. राहुल यांनी दान केलेल्या केसांचा वापर मुंबई येथील टाटा हॉस्पिटल संलग्न मदत ट्रस्ट ही संस्था विग बनवण्यासाठी करणार आहे. कर्करोगाशी लढत असलेल्या आणि केमोथेरपीमुळे केस गळून गेलेल्या आर्थिक दुर्बल घटकांतील व्यक्तींना हे विग उपलब्ध करून दिले जाणार आहे.

सरवदे हे थेरगाव येथील पदमजी पेपर प्रॉडक्ट्स या कंपनीत काम करीत आहेत. परिवर्तन सोशल फाऊंडेशन, थेरगाव सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांनी आत्तापर्यंत 45 पेक्षा जास्त वेळा रक्तदान तसेच 3 वेळा केसदान केले आहे. केसदानाबाबत अधिक माहिती देताना सरवदे म्हणाले, मी पहिल्यांदा 27 जुलै 2019 मध्ये दुसर्यांदा 11 फेब्रुवारी 2022 रोजी तर, तिसर्‍यांदा 2024 मध्ये नुकतेच केसदान केले आहे. त्यासाठी माझे कुटुंबीय, सहकारी, मित्र परिवार यांचा मला खूप मोठा पाठिंबा मिळाला. त्यांचेच प्रेम मला माझ्या हातून घडणार्‍या प्रत्येक चांगल्या कार्यास प्रेरणा देते. तसेच यापुढेदेखील समाजासाठी चांगले काम करण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहील.

आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, मग ते कोणत्याही स्वरूपात असो याच भावनेतून मी प्रथम 2019 मध्ये केसदान केले. त्यानंतर 2022 मध्ये तर, आता 2024 मध्ये तिसर्‍यांदा केसदान केले आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी केसदान ही संकल्पना मी राबविली. या संकल्पनेची दखल घेत अनेकांनी केसदान करून या मोहिमेत सहभाग घेतला. त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो.

– राहुल सरवदे

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news