वर्षभरात पीएमपीच्या तक्रारी दुप्पट : प्रवाशांनी वाचला तक्रारींचा पाढा | पुढारी

वर्षभरात पीएमपीच्या तक्रारी दुप्पट : प्रवाशांनी वाचला तक्रारींचा पाढा

राहुल हातोले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पीएमपीच्या बसमधून प्रवासादरम्यान प्रवाशांना होणार्‍या गैरसोयीबद्दल अथवा चालक, वाहकांच्या वर्तनाबाबत पीएमपीएमएलच्या संकेतस्थळावर तक्रार करता येते. त्यानुसार, गेल्या वर्षभरात 20 हजारांहून अधिक प्रवाशांनी तक्रारींचा पाढा वाचला आहे. हा आकडा गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट असल्याचे निदर्शनास आले आहे. बस वेगात धावणे, स्थानकावर वेळेत बस न येणे, प्रवाशांसोबत उध्दट वर्तन करणे, सिग्नल तोडणे, समोरील वाहनाला विनाकारण कर्णकर्कश्श आवाजात हॉर्नचा वापर करणे, इतर वाहनांना बसचा कट मारणे, भरधाव वेगात वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरणे आदींसह बर्‍याचदा चालकांच्या बेफिकीर वृत्तीमुळे समोरच्या वाहनचालकाच्या मृत्यूस पीएमपी चालक कारणीभूत ठरल्याच्या तक्रारी पीएमपीएमएलच्या संकेतस्थळवरील प्रवाशांनी तक्रारी दाखल केल्या आहेत.

हा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यासह पिंपरी-चिंचवडशहरातील नागरिकांमध्ये वाहन चालविताना समोरून पीएमपी दिसली मनात धस्स होते. अशा चालकांना लगाम घालण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. पीएमपी प्रशासनाने तक्रारी करण्यासाठी डेपोमध्ये ऑफलाईन अथवा ऑनलाईनद्वारे तक्रारी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे; परंतु कामासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना पीएमपीच्या चालकांविरोधात तक्रार करायला वेळ नसल्याने बर्‍याचदा या घटनांडे दुर्लक्ष केले जात आहे; परंतु नागरिकांच्या या वागण्याचा काही पीएमपी चालक गैरफायदा घेत असून, आता सर्रासपणे शहरात बेदरकारपणे वाहने दामटवित आहेत.  पीएमपी प्रशासनाने नागरिकांच्या समस्यांबाबत गंभीरपणे विचार करावा, तसेच चालक आणि वाहकांवर वेळेत योग्य ती कारवाई करावी. त्यामुळे शहरात पीएमपी चालकांच्या बेदरकार वृत्तीला लगाम लागू शकेल, अन्यथा असाच तक्रारीचा पाढा दरवर्षी वाढत जाईल. अशी भीती शहरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

भोसरी ते निगडी मार्गावर धावणार्‍या एका पीएमपी चालकाने रात्री सव्वाबाराच्या सुमारास माझ्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. यामध्ये दुचाकीचे नुकसान झाले असून, पायाला दुखापत झाली आहे. त्या वेळी चालकाने नुकसान भरपाई देतो असे म्हटले; मात्र नंतर त्याने माझे फोन उचलणे बंद केले. मी पीएमपीच्या संबंधित अधिकार्‍यांकडे लेखी तक्रार दिली असून, अद्याप त्याचे निराकरण झालेले नाही.

– दुचाकी चालक

पीएमपीबाबतच्या तक्रारींचे निराकरण आम्ही दरवर्षी शंभर टक्के करीत आहोत. या तक्रारींची आकडेवारी कमी करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करीत असून, प्रवाशांच्या सोईसाठी आवश्यक सूचना आणि तक्रारींबाबत निराकरण करीत आहोत.

– कैलास पाटील, विभाग नियंत्रक, पुणे

हेही वाचा

Back to top button