पुरंदर दुष्काळग्रस्त भागाची पाहणी; पाहणी नको, उपाययोजना करा : ग्रामस्थांची मागणी

पुरंदर दुष्काळग्रस्त भागाची पाहणी; पाहणी नको, उपाययोजना करा : ग्रामस्थांची मागणी

सासवड : पुढारी वृत्तसेवा : तीन महिन्यांपूर्वी आमच्याकडे केंद्रीय पथक येऊन पाहणी करून गेले आहे. दुष्ळाळग्रस्त परिस्थितीची सर्व आकडेवारी शासनदरबारी उपलब्ध असताना आता वारंवार पाहणी न करता तातडीने दुष्काळसदृश भागांत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिवरी येथील शेतकर्‍यांनी दुष्काळाच्या पाहणीसाठी आलेल्या जिल्हास्तरीय पथकाकडे केली. शिवरी (ता. पुरंदर) येथे जिल्हास्तरीय पथकाने दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करीत नागरिकांशी संवाद साधला. पशुसंवर्धन विभागाचे प्रादेशिक आयुक्त डॉ. संतोष पांचपोर, पशुसंवर्धन वैरण विकासचे उपायुक्त गणेश देशपांडे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार, जिल्हा परिषद जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे यांनी दुष्काळ दौर्‍याच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यात विविध गावांना भेट दिली.

या वेळी पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकारी विस्तार डॉ. अस्मिता सताळकर, तालुका कृषी अधिकारी सुरज जाधव, सहायक गटविकास अधिकारी जयराम लहमटे, पशुधन विकास अधिकारी सासवड डॉ. विष्णू ठोंबरे, डॉ. परमेश्वर परिहार, डॉ. माणिक बनगर, कृषी पर्यवेक्षक प्रवीण अडसूळ आदी उपस्थित होते. जिल्हास्तरीय पथकाने थेट वस्तीवर जाऊन शेतकर्‍यांच्या गोठ्यामध्ये जाऊन चार्‍याची पाहणी केली. या वेळी शेतकर्‍यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या वर्षी खरीप अथवा रब्बीची पेरणी झाली नाही. जनावरांना कोणत्याही प्रकारचा चारा-पाण्याची व्यवस्था नाही, अशा परिस्थितीत छावणी अथवा चारा डेपो सुरू करण्याची मागणी करीत आहेत. मात्र, दुष्काळ जाहीर होऊन चार ते पाच महिने उलटले तरी अद्याप दुष्काळाच्या कोणत्याही उपाययोजना शासनाकडून करण्यात आल्या नाहीत, अशा शब्दांत शेतकर्‍यांनी संताप व्यक्त केला.

शासनाने शेतकर्‍यांचा अंत पाहू नये

आता शेतकर्‍यांची आर्थिक स्थितीही कोलमडून गेली आहे. सोसायट्यांची कर्जफेड उंबरठ्यावर आली आहे. तरी सरकारने आता बळीराजाचा जास्त अंत पाहू नये. तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली. सरपंच प्रमोद जगताप, यमाईमाता देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ कामथे, माजी उपसरपंच विकास कामथे, प्रवीण कामथे, नवनाथ गायकवाड, सतीश लिंभोरे, अंकुश कामथे, अनिल कामथे आदी उपस्थित होते.

पुरंदर तालुक्यामध्ये तीव्र चारा आणि पाणीटंचाई असल्याने येथे चारा डेपो सुरू करण्यासाठी तालुका प्रशासनाकडून मंत्रालयात प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या पाहणीसाठी आम्ही आलो होतो. यामध्ये शिवरी व वाल्हे या दोन ठिकाणी पाहणी करून अधिकार्‍यांकडूनही परिस्थितीचा आढावा घेतला असता खर्‍या अर्थाने या भागामध्ये चार्‍या-पाण्याची तीव— टंचाई असल्याचे निदर्शनास आले. याबाबत हा अहवाल मंत्रालयात तातडीने पाठविला जाईल व पुढील कार्यवाही शासनस्तरावरून होईल.

– डॉ. अंकुश परिहार, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news