पुणे : पुढारी वृत्तसेवा : एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी केंद्राकडून विविध पूरक पोषक आहाराचे वाटप करण्यात येते. या पोषण आहारावर अनेकदा निकृष्ट असल्याची चर्चा होते. त्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून कडक पावले उचलली आहेत. महिला व बालकल्याण विभागाकडून जिल्ह्यातील सर्व बालविकास प्रकल्प अधिकार्यांना घरोघर जाऊन पोषण आहार तपासणीचे निर्देश दिले असून, शंका वाटल्यास तत्काळ प्रयोगशाळेत तपासणीही केली जाणार आहे. सहा महिने ते सहा वर्षे वयोगटातील लाभार्थी तसेच गरोदर आणि स्तनदा माता यांना अंगणवाडी स्तरावरून पूरक पोषण आहार उपलब्ध करून देण्यात येतो. या पोषण आहारांतर्गत घरपोच आहार, टीएचआर, गरम ताजा आहार तसेच गरोदर मातांसाठी अतिरिक्त आहारामध्ये बाळंतविडामार्फत आहार देण्यात येतो.
हा आहार अंगणवाडीमध्ये आल्यानंतर पर्यवेक्षण करणार्या पर्यवेक्षकांमार्फत तत्काळ तपासणी करण्यास जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तसेच आहाराच्या दर्जाबाबत शंका आल्यास त्या अंगणवाडीतून आहाराचा नमुना तत्काळ कार्यालयास पाठविण्यात यावा, त्यानंतर त्याची प्रयोगशाळेत तपासणी केली जाणार आहे. आहाराचा दर्जा चांगला असल्याची खात्री झाल्यानंतर त्याचे लाभार्थ्यांना वाटप करण्यात यावे, तसेच आहाराचा दर्जा कमी प्रतीचा आढळून आल्यास संबंधित पुरवठादाराकडून सर्व आहार बदलून घेण्याची कार्यवाही करण्यासही अधिकार्यांना निर्देश दिले आहेत.
प्रत्येक तालुक्यातून सध्या नमुने गोळा करण्यात येत आहेत. प्रत्येक बालविकास प्रकल्प अधिकार्यांना लाभार्थ्यांच्या घरी जाऊन आहाराची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर लाभार्थांचे अभिप्रायदेखील घेण्यात येत आहेत. शिरूर येथील एका प्रकरणाची अन्न व औषध प्रशासनाने तपासणी केली असून, तसेच जिल्हा परिषदेकडूनदेखील तपासणी करण्यात आली असून, तो आहार खाण्यायोग्य असल्याचे आढळून आले.
– जामसिंग गिरासे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प.
हेही वाचा