पिंपरी (पुणे) : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शनिवारी (दि. 24) सुरू करण्यात येत असलेल्या 'टॉयलेट सेवा' या अॅपद्वारे केवळ शहरातील नव्हे तर शहरात प्रवेश करणारे प्रवासी, विद्यार्थी, नागरिक, व्यावसायिक तसेच प्रवासी वाहतूक करणारे वाहनचालक यांच्यासह अनेकांना शहरातील स्वच्छतागृहांची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. पालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये शहरातील 238 सार्वजनिक स्वच्छतागृहांची ठिकाणे, सुविधांसह माहिती असलेल्या उपयुक्त अशा 'टॉयलेट सेवा' अॅपचे लोकार्पण आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त यशवंत डांगे, टॉयलेटसेवा अॅप विकसित करणारे अमोल भिंगे, तसेच त्यांचे सहकारी प्रितम चोपडा, सोनाली चोपडा, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, अमित पंडित, अण्णा बोदडे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, स्वच्छ भारत समन्वयक सोनम देशमुख, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ अमोल भिंगे यांनी शहरातील सार्वजनिक शौचालयांची ठिकाणे शोधण्यासाठी तसेच वापरानंतर त्या शौचालयाच्या स्थितीबाबत प्रतिसाद देण्यासाठी, तक्रारी नोंदविण्याची सुविधा उपलब्ध असलेले 'टॉयलेट सेवा' अॅप तयार केले आहे. त्यामध्ये शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची उपलब्धता व सोयी-सुविधांबाबत माहिती उपलब्ध आहे. तसेच या अॅपद्वारे उपलब्ध स्वच्छतागृहांमधील सुविधा तसेच त्रुटींबाबत तक्रारी नोंदविता येणार आहेत. त्याची दखल आरोग्य विभागामार्फत घेतली जाणार आहे. सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे यांनी प्रास्ताविक केले. पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले.
शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी 'टॉयलेट सेवा' अॅपचा वापर करावा. तसेच आपल्या परिचितांना, नातेवाईकांना या सुविधेबाबत माहिती द्यावी. बारकोड किंवा लिंक शेअर करावी आणि शहराच्या आरोग्यविषयक कामकाजात आपला सहभाग नोंदवावा.