तब्बल आठ वर्षांनंतर संशयित जाळ्यात ! गैरव्यवहारप्रकरणी कारवाई | पुढारी

तब्बल आठ वर्षांनंतर संशयित जाळ्यात ! गैरव्यवहारप्रकरणी कारवाई

पुणे : पुढारी वृत्तसेवा : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळास महाराष्ट्र व केंद्र शासन यांच्याकडून 484.86 कोटी प्राप्त झाले होते. हे अनुदान राज्यातील मातंग समाजातील पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यासाठी शासनाने मंजूर केले होते. त्यातील 367 कोटींचा घोटाळा झाला होता. या प्रकरणात तब्बल 8 वर्षांपासून फरार असलेल्या एकाला राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) अटक केली. कमलाकर रामा ताकवाले (वय 40, रा. सरफनगर, पैठण, जि. औरंगाबाद) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणात सीआयडीकडे एकूण 7 गुन्हे तपासावर आहेत. गुन्ह्यातील मुख्य आरोपी व महामंडळाचा तत्कालीन अध्यक्ष रमेश कदम हा गेल्या 8 वर्षांपासून कारागृहात आहे.

2012 ते 2015 या कालावधीत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष व तत्कालीन आमदार रमेश नागनाथ कदम व महामंडळाचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक (एम. डी.) श्रावण किसन बावणे आणि इतर महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी यांनी आपसात संगनमत करून एकूण 367 कोटी रुपये रकमेचा अपहार केला होता. ताकवले स्वतःचे नाव बदलून अहमदनगर जिल्ह्यात राहत असल्याची माहिती सीआयडीला मिळाली होती. त्यानुसार त्याला ताब्यात घेत अटक करण्यात आली. ही कारवाई सीआयडीचे अपर पोलिस महासंचालक प्रशांत बुरडे, पोलिस उपमहानिरीक्षक सारंग आव्हाड व पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश गि. बारी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी अपर पोलिस अधीक्षक अनुजा देशमाने, पोलिस निरीक्षक दिनेश पाटील, पोलिस हवालदार कृष्णकांत देसाई, राजेंद्र दोरगे यांच्या पथकाने केली.

फास्टॅगमुळे आला जाळ्यात
चार महिन्यांपासून ताकवलेचा तपास औरंगाबाद, अहमदनगर व पुणे जिल्ह्यात सीआयडीचे पथक करीत होते. तो अहमदनगर येथील अकोले येथे असल्याची माहिती तो चालवत असलेल्या चारचाकीच्या फास्टॅगमुळे सीआयडीला मिळाली होती. त्याआधारे त्याला संगमनगर येथील अहमद हॉटेल येथून 21 जून रोजी बेड्या ठोकण्यात आल्या.

हे ही वाचा : 

Bihar : बिहारमध्ये अमोनिया गॅस गळतीमुळे मजुराचा मृत्यू, ३० हून अधिक रुग्णालयात

Monsoon Update Live: येत्या ४८ तासांत मान्सून संपूर्ण देश व्यापणार; देश अन् राज्याच्या राजधानीत एकाचवेळी बरसणार

Back to top button