

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : नायजेरिया देशातून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या 6 जणांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. या माध्यमातून रविवारी शहरात ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे. मात्र, त्यांच्यामध्ये आजाराची कोणतेही लक्षणे नाहीत. सर्वांची प्रकृती ठणठणीत आहे.
चौदा दिवसांनंतरच्या आरटीपीसीआर चाचणीत निगेटिव्ह आढळल्यास त्यांना घरी सोडून देण्यात येणार आहे, असे महापालिकेचे सहायक वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.
डॉ. गोफणे यांनी सांगितले की, बाधित रुग्ण बुधवारी (दि. 24) शहरात आले. ते कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांना शनिवारी (दि. 27) पिंपरी कॅम्पातील नवीन जिजामाता रुग्णालयात दाखल केले.
महिला रुग्णास सुरुवातीला दोन दिवस सौम्य लक्षणे होती. सध्या सर्व रुग्णांना आजाराची कोणतीही लक्षणे नाहीत. त्यांच्या संपर्कात आलेल्या एकूण 14 जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यापैकी 6 जणांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार त्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. चौदा दिवसांनंतर त्यांची पुन्हा आरटीपीसीआर चाचणी केली जाईल. अहवाल निगेटिव्ह आल्यास त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. दक्षता म्हणून त्यांना होम आयसोलेट केले जाईल.
परदेशातून आलेल्या नागरिकांचे पुण्याच्या एनआयव्हीकडे आरटीपीसीआर चाचणी करण्याचे आदेश असल्याने महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात चाचणी केली जात नाही.
त्या नागरिकांचे घशातील द्रव नमुने एनआयव्हीकडे पाठविले जात आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. उपचारांसाठी महापालिकेच्या रुग्णालयांत सर्व यंत्रणा सज्ज आहे. तसेच, अनुभवी डॉक्टर उपलब्ध आहेत, असे त्यांनी सांगितले.
परदेशातून आलेल्या नागरिकांचे सर्व क्षेत्रीय कार्यालयानिहाय सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यांचा शोध घेण्यात येत आहे. कोरोना विषाणूमध्ये बदल होणे हे नैसर्गिक बाब आहे.
त्याबाबत नागरिकांनी भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोरोना नियमांचे पालन करावे. नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे. मास्कचा वापर करावा.
गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. सॅनिटायझरचा वापर करावा. मागील महिन्यात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून शहरात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले आहे.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचे 39 नवे रुग्ण रविवारी (दि. 5) आढळून आले, तर कोरोनाचे 34 रुग्ण दिवसभरात बरे झाले. शहरात सध्या 342 सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 215 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर, 127 रुग्ण होम आयसोलेट आहेत.
उपचार घेत असलेला एक रुग्ण रविवारी दगावला. दिवसभरात 5 हजार 799 नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. लसीकरण केंद्रावर दिवसभरात तब्बल 23 हजार 935 नागरिकांना लस देण्यात आली.
पिंपरी-चिंचवड शहरात ओमायक्रॉन या नव्या विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर महापौर उषा ढोरे यांनी नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
महापौर ढोरे म्हणाल्या की, कोरोना संक्रमणाप्रमाणे ओमायक्रॉन या नव्या आजारावर यश मिळवायचे आहे. रुग्णालयांत नव्या रुग्णांवर योग्य ते उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. घाबरून न जाता नेहमी मास्कचा वापर करावा.