

पुणे : अवघ्या 25 दिवसांच्या बाळाला जुलाबाचा त्रास होत असल्याने कमला नेहरू रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात (एनआयसीयू) दाखल करण्यात आले. आईचे दूध येत नसल्याने बाळाला गायीचे दूध देण्यात आले आणि त्यामुळे बाळाला रक्तदाब कमी होणे, श्वास घेण्यास त्रास होणे असा त्रास झाला. डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ करून 21 दिवस उपचारकेले. आता बाळाची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. (Pune News Update)
बाळाला एनआयसीयूमध्ये भरती झाल्यानंतर त्याची तपासणी करण्यात आली. त्यामुळे त्याचे शरीरातील पाणी कमी होणे, रक्तदाब कमी होणे, मेटॅबोलिक अॅसिडोसिस आणि श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे दिसली. त्याचे जन्मत: वजन 3.4 किलो होते आणि रुग्णालयात दाखल करताना 2.8 किलो इतके कमी झाले होते. साधारणतः वजन एक महिन्यात अर्ध्या किलोने तरी वाढून 4 किलो होणे अपेक्षित होते.
बाळाची अतिजोखमेची परिस्थिती पाहून डॉक्टर आणि परिचारिकांच्या टीमने उपचार सुरू केले. नातेवाईकांच्या संमतीने बाळाला व्हेंटिलेटर सपोर्टवर घेण्यात आले. रक्तदाब सामान्य करण्यासाठी औषधे देण्यात आली. गायीचे दूध दिल्यामुळे बाळाला जंतुसंसर्ग होऊन आतड्यांना सूज येऊन बाळाचे पोट पूर्ण फुगले होते. त्यामुळे आतडे फुटून तत्काळ शस्त्रक्रिया करण्याची गरज पडू शकत होती.
बाळ औषधांना व्यवस्थित प्रतिसाद देत नसल्यामुळे वरच्या दर्जाची औषधे (हायर अँटिबायोटिक्स) देण्यात आली. यादरम्यान, बाळाला पाच वेळा पांढर्या आणि लाल रक्तपेशी चढवण्यात आल्या. जंतुसंसर्ग झाल्यामुळे बाळाला आठ दिवस दूध देण्यात आले नव्हते. त्यामुळे शरीरातील प्रथिने कमी होऊन पूर्ण अंगाला सूज आली होती. त्यामुळे नसेद्वारे औषध देण्यात आले आणि हळूहळू अंगावरची सूज कमी होण्यास मदत झाली.
जवळपास दहा दिवस बाळाची स्थिती नाजूक होती आणि बाळ व्हेंटिलेटर व ऑक्सिजनच्या सपोर्टवर श्वास घेत होते. एनआयसीयूमध्ये 21 दिवस उपचार घेतल्यानंतर 46 दिवसाच्या बाळाला सुखरूप घरी सोडण्यात आले. एनआयसीयूमध्ये बालरोगतज्ज्ञ डॉ. स्मिता सांगडे आणि डॉ. रशीदा आर्सीवाला यांनी उपचार दिले, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत बोठे यांनी दिली.