

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब—ुवारी-मार्च 2026 मध्ये इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेला खासगीरीत्या प्रविष्ट होण्यासाठी 17 नंबरचा अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असून, इच्छुक विद्यार्थ्यांना 1 ऑगस्टपासून ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करता येईल. राज्य मंडळाचे सचिव देवीदास कुलाळ यांनी बुधवारी याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. (Latest Pune News)
आर्थिक दुर्बल घटकांमधील अनेक विद्यार्थी 17 नंबरचा अर्ज भरून, दहावी-बारावीच्या परीक्षेला प्रविष्ट होतात. त्याचप्रमाणे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे, अनेक विद्यार्थी काम करतात. त्यामुळे त्यांना पूर्णवेळ शिक्षण घेता येत नाही. या सर्व विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीची परीक्षा देता यावी, यासाठी राज्य मंडळाकडून परीक्षेला खासगीरीत्या प्रविष्ट होण्याची संधी दिली जाते. त्यासाठी या विद्यार्थ्यांना 17 नंबरचा अर्ज आणि शुल्क भरावे लागते.
राज्य मंडळाच्या परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांना 1 ते 31 ऑगस्ट दरम्यान ऑनलाइन पद्धतीने अर्ज आणि शुल्क भरायचे आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी भरलेला अर्ज, शुल्क भरल्याची पावती दोन प्रतीत, मूळ कागदपत्रे संबंधित कालावधीतच निवडलेल्या शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयात जमा करायची आहे.
विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला, दाखला नसल्यास द्वितीय प्रत आणि प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो जवळ ठेवावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना ही कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आहेत. संपर्कासाठी विद्यार्थ्यांनी ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक नोंदवणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्यानंतर, त्याची प्रत ई-मेल आयडीवर पाठवली जाणार आहे.
या अर्जाची प्रिंट आउट, शुल्क भरल्याची पावती, हमीपत्र आदींची छायाप्रत प्रत्येकी दोन प्रतीत काढून ठेवावी, असे आवाहन कुलाळ यांनी केले आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना http:/// www. mahahsscboard. in या संकेतस्थळावरील स्टूडंट कॉर्नर या पर्यायाचा वापर करण्याचे निर्देश राज्य मंडळाने दिले आहेत.
दहावीसाठी शुल्क - 1100 रुपये शुल्क आणि 100 रुपये प्रक्रिया शुल्क, विलंब शुल्क प्रती विद्यार्थी 100 रुपये
बारावीसाठी शुल्क - 1100 रुपये शुल्क आणि 100 रुपये प्रक्रिया शुल्क, विलंब शुल्क प्रती विद्यार्थी 100 रुपये
शुल्क भरण्याची पद्धत - ऑनलाइन