इंदापूर : शेतकर्यांची वारंवार हेटाळणी करणार्या आणि विधिमंडळात रमी खेळणार्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना मंत्रिमंडळात अजून का ठेवले आहे, असा थेट सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केला आहे. कोकाटेंकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची अशी कोणती गुपिते आहेत, ज्यामुळे सरकार कारवाई करायला घाबरत आहे, असा आरोपही त्यांनी केला. (Latest Pune Update)
इंदापूर येथील न्यायालयात बुधवारी एका खटल्याच्या कामकाजासाठी आले असता शेट्टी पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, अजित पवार केवळ नाराजी व्यक्त करतात; पण कोकाटेंचा ठामपणे राजीनामा मागत नाहीत. त्यांना तातडीने नारळ दिला पाहिजे. यावेळी शेट्टी यांनी महायुती सरकारवरही जोरदार टीका केली. शेतकरी आत्महत्या, कंत्राटदारांची थकलेली बिले आणि योजनांना निधी नसल्याने सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला.
या खटल्यानिमित्त राजू शेट्टी आणि एकेककाळचे त्यांचे सहकारी माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे दोघेही 2011 मध्ये ऊस दराबाबत झालेल्या आंदोलनाच्या खटल्यानिमित्त इंदापुरातील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात एकत्रित आले होते. मात्र, एकेकाळच्या या सहकार्यांनी एकमेकांशी संवाद साधणे तर दूरच; पण एकमेकांकडे बघितलेदेखील नाही. त्यांच्यातील हा दुरावा उपस्थितांमध्ये चर्चेचा विषय ठरला होता. दरम्यान, माध्यमांशी बोलताना शेट्टी यांनी सरकारच्या विरोधात ताकदीने उभे राहण्याची हिंमत दाखवल्यास एकत्र येण्यावर विचार होऊ शकतो, असे म्हणत खोत यांना टोला लगावला.