

पुणे : महिलांच्या आयटीएफ टेनिस स्पर्धेत भारताच्या वैष्णवी आडकर, माया राजेश्वरन रेवती, वैदेही चौधरी, श्रीवल्ली रश्मिका भामिदिप्ती यांनी प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून आगेकूच कायम राखली.
या स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये दुसऱ्या फेरीत आठव्या मानांकित भारताच्या वैष्णवी आडकर हिने बेलारूसच्या पोलिना बखमुतकिनाचे आव्हान 6-1, 6-1 असे एकतर्फी मोडीत काढले. चुरशीच्या लढतीत भारताच्या युवा टेनिसपटू माया राजेश्वरन रेवती हिने रशियाच्या एना सेडीशेवाचा 4-6, 7-5, 6-3 असा तीन सेटमध्ये पराभव करून आपली विजयी मालिका कायम ठेवली. सहाव्या मानांकित भारताच्या वैदेही चौधरीने रशियाच्या मारिया कल्याकिनाचा 3-6, 6-2, 7-5 असा संघर्षपूर्ण पराभव केला. दुसऱ्या मानांकित भारताच्या श्रीवल्ली रश्मिका भामिदिप्ती हिने कझाकस्तानच्या अरुझान सगंडिकोवाचा 6-1, 6-1 असा सहज पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली.
अव्वल मानांकित खेळाडूवर सनसनाटी विजय मिळवणाऱ्या रशियाच्या मारिया गोलोविना हिने क्वालिफायर भारताच्या सोनल पाटीलचा 6-2, 6-4 असा पराभव केला. फान्सच्या सेनिया इफारमोव्हाने रशियाच्या व्लादा मिन्चेवाचा 6-1, 6-2 असे मोडीत काढले.
दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या दुसऱ्या मानांकित वैष्णवी आडकर व अंकिता रैना यांनी रशियाच्या एना सेडीशेवा व नेदरलँडच्या एम्मा व्हॅन पॉपेलचा 6-1, 6-4 असा पराभव केला. भारताच्या चौथ्या मानांकित श्रीवल्ली रश्मिका भामिदिप्ती व वैदेही चौधरी या जोडीने थायलंडच्या लुंडा कुम्होम व तनुचापोर्न योंगमोडचा 6-3, 6-0असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. भारताच्या झील देसाईने एलिना नेपलीच्या साथीत डेन्मार्कच्या एलेना जमशिदी व मारिया मिखाइलोवा यांचा 6-4, 6-4 असा पराभव केला.