भिकारी, तृतीयपंथींच्या पुनर्वसनासाठी स्वतंत्र पथक

भिकारी, तृतीयपंथींच्या पुनर्वसनासाठी स्वतंत्र पथक

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

पिंपरी-चिंचवड शहरात रस्त्यांवर व चौकांत भिकारी व तृतीयपंथी फिरतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. त्यांचे सर्वेक्षण करून पुनवर्सन करण्यासाठी महापालिकेने एक स्वतंत्र पथक स्थापन केले आहे.

त्यामध्ये महापालिकेचे अधिकारी, पोलिस व स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.

'पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी होणार भिकारीमुक्त' असे ठळक वृत्त 'पुढारी'ने मंगळवारी (दि.30) प्रसिद्ध केले होते. महापालिकेच्या त्या निर्णयाचे सर्व स्तरावरून स्वागत होत आहे.

त्या संदर्भात पालिकेने स्वतंत्र पथक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पथकामध्ये पालिकेचे अधिकारी, पोलिस कर्मचारी व सोहम ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी असणार आहेत.

त्यामध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
शहरात फिरून भिकारी महिला, पुरुष, बालक तसेच तृतीयपंथींचा शोध घेतला जाणार आहे.

आजारी व जखमींवर तत्काळ उपचार करण्यात येणार आहेत. त्यासाठी पालिकेचे डॉक्टर व परिचारिकांचे सहाय घेतले जाणार आहे. त्यांच्या निवारा व जेवणाची व्यवस्था केली जाणार आहे.

ज्यांना रोजगार हवा आहे, त्यांना प्रशिक्षण देऊन रोजगार देण्यात येणार आहे. अशा सर्वांचे पुनवर्सन करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांचे सहाय घेण्यात येणार आहे.

बालकांसाठी शिक्षणाची व्यवस्था असणार आहे. गरज पडल्यास ज्येष्ठांना वृद्धाश्रमात ठेवले जाणार आहे.

पुनर्वसनाचे महापालिकेचे उपक्रम

शहरात फिरणारे भिकारी व तृतीयपंथींचे पुनवर्सन करण्यासाठी महापालिकेने हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यांना या माध्यमातून आवश्यक त्या सर्व सुविधा महापालिका पुरविणार आहे. त्यासाठी पोलिस तसेच स्वयंसेवी संस्थांचे साहाय्य घेण्यात येत आहे.

या उपक्रमात शहरात स्वयंसेवी संस्था सहभागी होऊ शकतात. यासंदर्भात काही सूचना असल्यास महापालिकेस कळवाव्यात, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news