

इंदापूर: बुधवारी (दि. 13) झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्याचा इंदापूर तालुक्यातील अनेक गावांना मोठा फटका बसला आहे. निमगाव केतकी, कचरवाडी, गोतोंडी, वरकुटे खुर्द आणि रामकुंड परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पॉलीहाऊस, शीतगृहे, फळबागा आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत एक शेतकरी जखमी झाला असून, जनावरांनाही फटका बसला आहे.
कचरवाडी येथील अक्षय अशोक आदलिंग यांनी गट क्रमांक 32 मध्ये सुमारे 40 लाख रुपये खर्च करून उभारलेले शीतगृह आणि पॉलीहाऊस वादळी वाऱ्यात कोसळले. यामध्ये त्यांनी काळ्या वांग्याची लागवड केली होती.
अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे वांग्याचे पीक, आच्छादनासाठी वापरण्यात आलेले साहित्य तसेच लोखंडी अँगलसह संपूर्ण संरचना जमीनदोस्त झाली. या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी अक्षय आदलिंग, आदलिंग आणि किसन आदलिंग यांनी केली आहे. शेंडेवस्ती येथील दशरथ कृष्णा शेंडे यांच्या शीतगृहाचेही मोठे नुकसान झाले.
त्यांनी अवघ्या 10 दिवसांपूर्वी 9 रुपये दराने चायना काकडीची रोपे खरेदी करून लागवड केली होती. मात्र, वादळी वाऱ्यामुळे शीतगृह कोसळून संपूर्ण पीक उद्ध्वस्त झाले. शासनाने या अस्मानी संकटातून मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, शेंडे वस्ती येथील सुदाम शेंडे यांच्या घरावरील पत्रे वादळी वाऱ्यात उडून गेली.
या दुर्घटनेत घराची भिंत कोसळून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उडालेली पत्रे शेजारील गुलमोहराच्या झाडावर आदळून काही पत्रे त्या झाडाखाली बांधलेल्या गायींच्या अंगावर पडल्याने जनावरेही जखमी झाली, तर काही पत्रे घरापासून सुमारे 200 फूट अंतरावरील डाळिंबाच्या बागेत जाऊन पडली. चार खोल्यांच्या घरावरील पत्रे उडाल्याने शेंडे यांचा संसार अक्षरशः उघड्यावर आला असून, घरातील जीवनावश्यक साहित्य भिजून नुकसान झाले आहे.
निमगाव केतकी हद्दीतील मानेवस्ती येथे विजय भोंग यांच्या डाळिंबबागेचे मोठे नुकसान झाले. जोरदार वाऱ्यामुळे डाळिंबाची झाडे उन्मळून पडली, तर संरक्षणासाठी लावलेले नेट तुटल्याने पिकांचे नुकसान झाले. सोनमाथा परिसरातील सचिन शिंदे यांच्या पेरूबागेलाही गारपिटीचा मोठा फटका बसला असून, गारांच्या मारामुळे फळांवर चट्टे पडून तडे गेले आहेत.
तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, कृषी विभाग आणि महसूल विभागाने संयुक्त पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.