onion price drop in Maharashtra
बावडा: चांगला दर मिळेल, या अपेक्षेने उन्हाळी हंगामातील कांद्याची साठवणूक केली. मात्र आता खरीप हंगामातील नवीन कांदा बाजारात येण्याची वेळ झाली, तरी जुन्या कांद्याला अपेक्षित दर मिळत नाही. त्यामुळे मिळेल त्या दरात उन्हाळी कांदा विक्रीसाठी बाहेर काढवा लागत असल्याने इंदापूर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकर्यांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून येत आहे.
बाजारामध्ये कांद्याचे वर्षभरात भाव हे स्थर राहत नाहीत, त्यामध्ये सतत चढउतार होत असतो. त्यामुळे कांद्याची साठवणूक करून बाजारात भाव तेजीत असताना कांद्याच्या विक्रीचे नियोजन इंदापूर तालुक्यातील शेतकरी वर्षानुवर्ष करीत आला आहे. (Latest Pune News)
मात्र चालू वर्षी शेतकर्यांना कांदा साठवणुकीचा आर्थिक फायदा होताना दिसत नाही, असे प्रगतशील शेतकरी शिरीषकुमार वाघमोडे (काटी), श्री भैरवनाथ सुरवड-भांडगाव सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय घोगरे (सुरवड), रामदास रासकर (दगडवाडी), योगेश गायकवाड (बोराटवाडी) यांनी सांगितले.
कांदा उत्पादक शेतकरी शहाजीराव कोकाटे (सराटी) यांनी उन्हाळ्यात 5 महिन्याचा कांदा 2 एकर क्षेत्रावर घेतला होता. कांद्याचे चांगले उत्पादन निघाले. नंतर भविष्यकाळात चांगला भाव येईल या आशेने त्यांनी कांद्याची साठवणूक केली आहे. मात्र अजूनही कांद्याचे भाव हे सोलापूर-पुणे बाजार समितीमध्ये सरासरी 10 ते 14 असे स्थिर आहेत.
आता नवीन कांदा बाजारात येण्यापूर्वी साठवलेला कांदा विक्री करणार असल्याचे कोकाटे यांनी सांगितले. सध्या इंदापूरमध्ये दर वाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या कांदा उत्पादक शेतकर्यांनी आणखी नुकसान नको म्हणून मिळेल त्या दराने कांदा विक्रीचा निर्णय घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्याच्या दरामुळे कांदा उत्पादनाचा खर्चही भरून निघत नाही, अशी स्थिती असल्याचे शिवाजीराव शिंदे (शेटफळ), प्रकाशराव घोगरे (सुरवड) यांनी सांगितले.
कांद्याचे दर आणखी घसरण्याची भीती
खरीप हंगामातील नवीन कांदा बाजारात आल्यावर बाजारातील आवक वाढून कांद्याचे भाव आणखी ढासाळण्याची भीती आहे. त्यामुळे सध्या कांदा उत्पादक शेतकर्यांचा कल हा सध्या येईल त्या भावाने कांदा विक्री करण्याकडे दिसून येत आहे.