Dattatray Bharane: भरणेंकडून इंदापूरकरांना कृषी महाविद्यालयाची अपेक्षा
संतोष ननवरे
शेळगाव : इंदापूर तालुक्यातील शेती क्षेत्रात मोठे नाव असलेले इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार व नुकतेच कृषिमंत्रिपदी विराजमान झालेले मंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यात शासकीय कृषी महाविद्यालय सुरू करावे, अशी अपेक्षा आता इंदापूर तालुक्यातून व्यक्त होऊ लागली आहे. (Pune Latest News)
कृषिमंत्री झालेले दत्तात्रय भरणे हे शेतीची जाण असणारे कृषिमंत्री आहेत. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे ते अतिशय निकटवर्तीय आहेत, यामुळे भरणे हे नक्कीच कृषिमंत्रिपदाच्या काळात इंदापूर तालुक्यात शासकीय कृषी महाविद्यालय इंदापूरकरांसाठी सुरू करतील, अशी इंदापूरकरांना खात्री आहे. इंदापूर तालुक्यात वालचंदनगर, अंथुर्णे, लासुर्णे, कळंब, जंक्शन परिसरात शेती महामंडळाचे हजारो एकर क्षेत्र आहे. काही क्षेत्र औद्योगिक विकास महामंडळाला देण्यात आले असले, तरी उर्वरित जागेमध्ये शासकीय कृषी महाविद्यालय काढता येईल. त्यामुळे जागेचा प्रश्नदेखील निर्माण होणार नाही. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आग्रही भूमिका घेतली तर काही दिवसांतच त्याला मान्यता मिळू शकते.
इंदापूर तालुक्याला उजनी धरणासह निरा व भीमा नदीचे मोठे वरदान लाभलेले आहे. इंदापूर तालुका हा यामुळे बागायत व शेतीप्रधान तालुका आहे. या तालुक्यात युवक शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून द्राक्ष, डाळिंब, पेरू, सीताफळ, केळी, ऊस, ड्रॅगन फूड, फॅशन फूड अन्य फळबागांच्या लागवडीतून शेती करीत आहेत.
शासकीय कृषी महाविद्यालयाबरोबरच तालुक्यातील शेतकर्यांना फायदेशीर ठरतील अशा अनेक योजना शेती अभ्यास केंद्रासह अन्य सुविधा कृषी खात्यामार्फत उपलब्ध कराव्यात, अशीदेखील अपेक्षा इंदापूर तालुक्यातील शेतकर्यांनी, युवकांनी व्यक्त केली आहे.
युवक करताहेत उत्तम प्रकारची शेती
इंदापूर तालुक्यातील अनेक युवक पुणे, मुंबई, कोल्हापूर, राहुरी, दापोलीसह अन्य महाराष्ट्रात असलेल्या कृषी महाविद्यालयातून शिक्षण घेऊन उत्तम प्रकारची शेती करीत आहेत, त्यांच्या शेतीमालाचा अन्य राज्याबरोबरच परदेशात देखील मोठा बोलबाला आहे. इंदापूर येथे शासकीय कृषी महाविद्यालय सुरू झाल्यास अनेक युवकांना त्याचा मोठा फायदा होईल. शिक्षणाच्या जोरावर उत्तम पद्धतीच्या तंत्रज्ञाचा वापर करून शेतीव्यवसाय करतील व यामुळे इंदापूर तालुक्याचादेखील आर्थिक उन्नती होण्यास मोठा फायदा होणार आहे.

