

न्हावरे : आंधळगाव (ता. शिरूर) परिसरातील शिरूर-चौफुला महामार्गावर मंगळवारी (दि. 5) मध्यरात्रीच्या सुमारास भरधाव असलेल्या कारचा अपघात होऊन कारमधील एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. विशेष म्हणजे या अपघातात मृत्यू झालेले व्यक्ती हे कारचालकाचे वडील असून, याप्रकरणी संबंधित चालक मुलाविरुद्ध त्याच्याच मामाने शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. (Pune Latest News)
बाळासाहेब रामभाऊ नाईकवाडी (वय 56, रा. राधाअकोले, ता. अकोले, जि. अहिल्यानगर) यांचा मृत्यू झाला असून, चारचाकी वाहनचालक यश बाळासाहेब नाईकवाडी (रा. राधाअकोले, ता. अकोले, जि. अहिल्यानगर) याच्यावर भारतीय दंड संहिता कलम व मोटार वाहन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची फिर्याद दीपक सखाराम सोनवणे (वय 35, रा. राजापूर, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात दिली आहे.
मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास शिरूर-चौफुला महामार्गावर आंधळगाव (ता. शिरूर) गावाच्या हद्दीतील जुन्या बंद पडलेल्या कंपनीजवळ यश नाईकवाडी हा चारचाकी (एमएच 11 सीक्यू 7050) गाडीने वडिलांसह जात होता. दरम्यान, समोरून कुत्रा आडवा आल्याने गाडी बाजूला घेताना गाडी रस्त्याच्या खाली जाऊन जोरात आदळली. त्यानंतर या अपघातात चालक यश नाईकवाडी याचे वडील बाळासाहेब नाईकवाडी हे गाडीतून बाहेर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात घडवून आणल्यामुळे आणि वाहनचालक यश नाईकवाडी हा वडिलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्यामुळे फिर्यादी दीपक सोनवणे यांनी स्वतःच्या भाच्याविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. शिरूर पोलिसांनी यश नाईकवाडी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.