निरा/सोमेश्वरनगर: वीर धरणाच्या एका दरवाजातून रविवारी (दि. 22) सकाळपासून विसर्ग सुरू आहे. परंतु, वीर धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने वीर धरण प्रशासनाने मंगळवारी (दि. 24) सायंकाळी 6 वाजता धरणातून 22 हजार 360 क्युसेकने निरा नदीत विसर्ग सोडला. त्यामुळे निरा नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊन निरा नदी खळखळून वाहू लागली.
वीर धरणात मंगळवारी सकाळी सहा वाजता 7.827 टीएमसी म्हणजेच 83.19 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. निरा देवघर, गुंजवणी व भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन ते चार दिवसांपासून दमदार पाऊस पडत आहे. 35 तासांत टेमघरला 146 मिलिमीटर पाऊस त्यामुळे निरा खोऱ्यातील निरा देवघर, भाटघर व गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाणी वाहत वीर धरणात येत असल्याने वीर धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. (Latest Pune News)
मंगळवारी सकाळी 11 वाजता वीर धरणाच्या तीन दरवाजांतून 20 हजार 960 क्युसेक व विद्युत गृहातून 1 हजार 400 क्युसेक असा 22 हजार 360 क्युसेकने विसर्ग निरा नदीत सुरू आहे. त्यामुळे निरा नदी खळखळून वाहत आहे.
गुरुवारी (दि. 26) माउलींचा पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. त्यापूर्वी वारकरी अंघोळीसाठी निरा नदीत जात असतात. त्यावेळी त्यांना व माउलींच्या पादुकांना निरा स्नान घालताना अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, निरा नदीकाठावरील रहिवाशांनी नदीपात्रात जाऊ नये, याकरिता धरण प्रशासनाकडून सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.
प्रशासनाने दक्षता घेण्याची आवश्यकता
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील माउलींच्या पादुकांना निरा स्नान गुरुवारी (दि. 26) दुपारी दीड वाजता घातले जाणार आहे. त्या वेळी निरा नदीची पाणीपातळी कमी न झाल्यास माउलींच्या पादुकांना निरा स्नान घालताना व वारकर्यांना निरा नदीत अंघोळ करताना अडचण येण्याची शक्यता नाकारता येत नाही. वीर धरण प्रशासनाने वीरमधून सोडला जाणारा विसर्ग पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात प्रवेश करेपर्यंत कमी करणे गरजेचे आहे. तसेच प्रशासनाने याबाबत दक्षता घेणे आवश्यक आहे.