

खडकवासला: शनिवार, रविवार तसेच सुटीच्या दिवशी हजारो पर्यटकांची वर्दळ असलेल्या सिंहगड-पानशेतच्या जंगलात बिबट्यांची संख्या वाढली आहे. सध्या पडत असलेल्या पावसामुळे दाट गवत, झुडपे वाढली आहेत. त्यामुळे बिबट्यांचा वावर वाढल्याने पर्यटकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन वन विभागाने केले आहे.
या परिसरात 20 ते 25 बिबटे आहेत. त्यातील 6 ते 7 बिबटे एकट्या सिंहगड किल्ल्याच्या परिसरात आहेत. गडाच्या पश्चिमेला जंगलासह पानशेत, वरसगाव आणि राजगड भागात 15 ते 20 बिबटे आहेत. पावसामुळे वन्यप्राण्यांची वर्दळ जंगलात वाढली आहे. त्यामुळे जंगलात बिबट्यांना मुबलक खाद्य तसेच पाणी मिळत आहे. परिणामी, मागील 8 ते 10 दिवसांपासून बिबट्यांचे दर्शन सिंहगड किल्ल्याच्या घाट रस्त्यासह आसपासच्या गावांत, वाड्या-वस्त्यांसह शेतशिवारात होऊ लागले आहे. (Latest Pune News)
सिंहगडाच्या पायथ्याला असलेल्या कल्याण (ता. हवेली) येथील शिवकालीन करंजाईदेवीच्या मंदिराच्या आवारात नकताच रात्री साडेदहाच्या सुमारास एक धष्टपुष्ट बिबट्या आला होता. हा बिबट्या बराच वेळ आवारातील झुडपांत दबा धरून बसला होता. बिबट्याची चाहूल लागल्याने गावातील युवकांनी मोबाईल फोनमध्ये बिबट्याच्या हालचालीचे चित्रीकरण केले. युवकांच्या आवाजाने बिबट्या आवारातील भिंतीवर चढून सिंहगडाच्या जंगलात पसार झाला.
जंगलात मोठ्या प्रमाणात इंग्लिश तसेच हायब्रीड जातीची शिकारी कुत्री शिकार करणार्या पर्यटकांनी सोडली आहेत. ही कुत्री रातोरात 10 ते 20 शेळ्या-मेंढ्या, मोर, लांडोर, ससे, हरीण, माकड, सांबर, चितळ आदी जनावरांचा फडशा पाडत आहेत. त्यामुळे वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
पूर्वी स्थानिक गावकरी जंगलात वन्यप्राण्यांची शिकार करीत असत. आता अलीकडच्या काळात पर्यटनाच्या नावाखाली जंगलात धुडगूस घालणारे पुण्या-मुंबईचे धनदांडगे कमरेला पिस्तूल अडकवून हातात इंग्लिश कुत्री घेऊन शिकार करीत आहेत.
- शंकरनाना निवंगुणे, शेतकरी, आंबी
वनक्षेत्रात बेकायदा वन पर्यटनाच्या नावाखाली धुडगूस घालणार्या, वन्यजीवांची शिकार करणार्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी. वनक्षेत्राच्या दर्शनी भागात, मुख्य रस्त्यावर फलक लावण्यात यावेत.
- भगवान पासलकर, माजी अध्यक्ष, पुणे जिल्हा दूध संघ
सिंहगड किल्ल्याच्या कोंढापूर फाटा, अतकरवाडी आदी परिसरात 6 ते 7 बिबटे आहेत. बिबट्यांचा कोणत्याही प्रकारचा उपद्रव नाही. बिबट्यांसह हजारो वन्यजीवांचा सिंहगडच्या जंगलात अधिवास आहे. त्यामुळे पर्यटक तसेच स्थानिक शेतकरी, रहिवाशांनी बिबटे तसेच वन्यजीवांची छेडछाड करू नये. सायंकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत सिंहगडाच्या जंगलात जाण्यास प्रतिबंध आहे.
- समाधान पाटील, वनपरिमंडल अधिकारी, सिंहगड वन विभाग