

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पाऊस व बदलत्या वातावरणामुळे पहिल्याच पावसात संसर्गजन्य आजारांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे शहरातील दवाखान्यांत रुग्णांची गर्दी पाहण्यास मिळत आहे. पावसाला सुरुवात झाल्यानंतर 35 अंश तापमान हे 23 अंशावर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून मधूनच कधी कडाक्याची थंडी जाणवते तर कधी वातावरण ढगाळ होऊन पाऊस पडायला लागतो.
कडक ऊन असतानाही हवेत गारवा जाणवतो. या बदलत्या हवामानामुळे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. गेल्या आठ दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलामुळे व कुंद वातावरणामुळे कणकणी येणे, अनुत्साही वाटणे, डोकेदुखी अशा आजारात वाढ झाली आहे. अचानक वाढलेला गारवा आरोग्याला बाधक ठरत आहे. लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला, कफचे प्रमाण वाढले आहे.
सध्या तरी रिमझिम पाऊस पडत आहे. त्यामुळे वातावरण दूषित झाले आहे. रुग्णालयात सर्दी, जुलाब, डोकेदुखी, अंगदुखी, श्वसन विकारात वाढ झाली आहे. तसेच डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. नागरिकांनी पाणी उकळून प्यावे. पावसात भिजू नये, याची काळजी घ्यावी. लक्षणे दिसल्यास डॉक्टरांकडे जावे.
– डॉ. किशोर खिलारे, अध्यक्ष, जनआरोग्य मंच.
हेही वाचा