

दौंड: दौंड शहर व आजूबाजूच्या परिसरात अवैध धंद्यांनी मोठ्या प्रमाणात डोके वर काढले आहे. यामध्ये प्रामुख्याने पत्त्याचे क्लब जोरात सुरू आहेत. विशेष म्हणजे थातूरमातूर कारवाईचा फार्स पोलिस करीत असून या व्यवसायातील मोठ्यांना मात्र अभय देत आहे.
दि. 12 मार्च रोजी पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी शहरातील अवैध धंदे बंद करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. त्यानंतर दोन दिवसांत पोलिसांनी थातूरमातूर कारवाई करून मोठी कारवाई केल्याचा आव आणला. (Latest Pune News)
परंतु यानंतर लगेचच शहरात अनेक ठिकाणी पत्त्याचे क्लब, गांजा विक्री, हातभट्टीची दारू, चक्री, मटका व इतरही अवैध धंदे जोरात सुरू झाले असून ते आजतागायत सुरू आहेत. दौंड-पाटस रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय व पत्त्याचा क्लब मोठ्या प्रमाणात सुरू आहे. हा क्लब काही केल्या बंद होईना, कारण त्याला मोठा राजकीय वरदहस्त आहे, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
यासह शहरात खासगी सावकारीदेखील सुरू आहे, परंतु सावकारांच्या भीतीने कोणीही तक्रार द्यायला पुढे येत नाही. कारण ज्यांनी सावकाराकडून कर्ज घेतले आहे, त्यांना मारहाण होण्याची शक्यता आहे. या खासगी सावकारीने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत, परंतु सावकाराच्या भीतीला घाबरून कोणी त्यांची तक्रार करत नाही, असे आजचे चित्र दौंड शहरात आहे.
दौंड शहरात काही मटका घेणारे बहादूर शहरातील एका बड्या नेत्याचे नाव सांगून खुलेआम हा व्यवसाय करत आहेत. विशेष म्हणजे ही बाब त्या बड्या नेत्याला समजल्यावर त्यांनी या मटकाबहाद्दरांची कानउघाडणी केली होती, परंतु शहरातील काही केल्या अवैधधंदे बंद होईनात.
दोन पोलिस चालवितात कारभार?
दरम्यान ज्याप्रमाणे या अवैध व्यवसायांना राजकीय वरदहस्त असल्याची चर्चा होत आहे, त्याचप्रमाणे पोलिस ठाण्यातील दोन कर्मचारी हा सर्व व्यवसाय हाताळत असल्याचे देखील नागरिकांमध्ये बोलले जात आहे. दौंड पोलिस ठाण्यामधील ते दोन कर्मचारी कोण आहेत याची माहिती पोलिस अधीक्षकांनी गोपनीय पद्धतीने घेतल्यास यामागील गौडबंगाल नक्कीच पुढे येऊ शकते. त्यामुळे पोलिस अधीक्षकांनी यासाठी पुढाकार घेऊन कारवाई करावी, अशी मागणी जनतेमधून जोर धरू लागली आहे.