

जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तानी दहशतवादविरोधात ऑपरेशन सिंदूर राबविले. भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) नऊ दहशतवादी अड्ड्यांना लक्ष्य केले. दरम्यान पाकिस्तान पुन्हा भारतावर प्रतिहल्ला करण्याची शक्यता गुप्तचर संस्थांनी व्यक्त केली.
ऑपरेशन सिंदूरविषयी माहिती देण्यासाठी आज भारतीय लष्कराने संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी " भारतावर आणखी हल्ले होऊ शकतात, असे दहशतवादी कारवायांवर लक्ष ठेवणाऱ्या भारतीय गुप्तचर संस्थांनी म्हटले आहे. या हल्ल्यांचा सामना करणे आणि त्यांनी थांबवणे आवश्यक वाटत आहे, असे सूचित केले आहे.
दरम्यान पत्रकार परिषदे बोलताना मिस्री पुढे म्हणाले, भारताची कारवाई दहशतवादविरोधीच करण्यात आली आहे. दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठीच 'ऑपरेशन सिंदूर' राबवण्यात आले. भारताने दहशतवादविरोधात आपल्या अधिकारांचा वापर केला आहे. यानंतर पाकिस्तानने आगळीक केल्यास पाकिस्तानचे काही खैर नाही, भारत चोख प्रत्युत्तर देईल, पत्रकार परिषदेतून पाकिस्तानला इशारा देखील देण्यात आला आहे
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) नऊ दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ले केले. हल्याच्या १५ दिवसांनंतर, भारताच्या तिन्ही सैन्याने पाकिस्तानला योग्य उत्तर देण्यासाठी 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले आहे. भारतीय सैन्याच्या या कारवाईनंतर पाकिस्तान सीमेवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी संरक्षण तुकड्या सक्रिय करण्यात आल्या आहेत.