

खडकवासला: पानशेत रस्त्यावरील गोर्हे खुर्द (ता. हवेली) येथील खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पोहताना बुडून साहिल बामगुडे (वय 23, रा. रांजणे, ता. राजगड) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 5) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. मंगळवारी (दि. 6) सकाळी सातच्या सुमारास साहिलचा मृतदेह धरणातील पाण्यावर तरंगताना घटनास्थळी सापडला.
साहिल बामगुडे हा मित्रांसोबत पोहण्यासाठी धरणात उतरला होता. खोल पाण्यातील खड्ड्यात पडून तो बेपत्ता झाला. त्याला पोहता येत नव्हते. साहिल पाण्यात बेपत्ता झाल्याने त्याच्या मित्रांनी जोरदार आरडाओरडा केला. त्यावेळी धरणतीरावरील पर्यटक भीतीने निघून गेले. (Latest pune news)
याबाबत माहिती मिळताच हवेली पोलिस ठाण्यातील पोलिस अंमलदार प्रवीण ताकवणे व विजय कांबळे यांच्यासह अग्निशमन दल तसेच हवेली तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीचे तानाजी भोसले, गणेश सपकाळ आदींनी घटनास्थळी धाव घेतली.
सोमवारी रात्री साडेआठपर्यंत साहिल याचा शोध घेतला. मात्र, अंधारामुळे साहिल सापडला नाही. दुसर्या दिवशी मंगळवारी (दि. 6) सकाळी सातच्या सुमारास साहिलचा मृतदेह तरंगत असलेला आढळला. हवेली आपत्ती व्यवस्थापन पथकाने त्याचा मृतदेह बाहेर काढला. याप्रकरणी हवेली पोलिस तपास करत आहेत.
दरम्यान, साहिल बामगुडे हा तीन ते चार फूट खोल पाण्यात पोहण्यासाठी उतरला होता. मात्र, वाळूउपसा केल्याने तेथे 10 ते 12 फूट खोल खड्डे पडले असल्याने पाण्यात असलेल्या खड्ड्यात पडून साहिलचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती पोलिस हवालदार प्रवीण ताकवणे यांनी दिली.