पुणे : जयभवानीनगर, काळेवाडीत आघाडी, उमेदवारी हाच कळीचा मुद्दा

पुणे : जयभवानीनगर, काळेवाडीत आघाडी, उमेदवारी हाच कळीचा मुद्दा

ज्ञानेश्वर बिजले

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे वर्चस्व असलेल्या नवीन प्रभाग क्रमांक 30 (जयभवानीनगर – केळेवाडी) मध्ये आघाडीचा निर्णय आणि उमेदवारांची निवड हाच कळीचा मुद्दा ठरणार आहे.

Ward 30
Ward 30

राष्ट्रवादीचे नगरसेवक दीपक मानकर यांनी पक्षातर्फे प्रभागातील तिन्ही जागांवर दावा सांगत तयारी सुरू केली आहे. दुसर्‍या बाजूला काँग्रेसचे नगरसेवक रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम यांनीही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. गेल्या वेळी जुन्या प्रभाग क्रमांक 11 (रामबाग कॉलनी – शिवतीर्थनगर) मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होती. जुन्या प्रभाग 11 मधील सुमारे 80 टक्के भाग नवीन प्रभाग 30 मध्ये आहे. त्याचबरोबर जुना प्रभाग 12 (मयूर कॉलनी- डहाणूकर कॉलनी) आणि जुना प्रभाग 13 (एरंडवणा -हॅपी कॉलनी) यांतील प्रत्येकी दोन हजार मतदारांचे भाग नवीन प्रभागात समाविष्ट झाले आहेत. नव्या प्रभागातील सुमारे 65 टक्के भाग झोपडपट्टीचा असून, तेथे सहा मोठ्या झोपडपट्ट्या आहेत. उर्वरित मतदार सोसायट्यांतील रहिवासी आहेत.

राष्ट्रवादीचा वरचष्मा

जुन्या प्रभाग 11 मधून राष्ट्रवादीचे मानकर, काँग्रेसचे कदम, वैशाली मराठे, भाजपच्या छाया अजय मारणे हे नगरसेवक 2017 मध्ये निवडून आले. 2012 मध्ये दोन नगरसेवकांचा प्रभाग असताना, लगतच्या दोन प्रभागांतून कदम व मराठे, तसेच मानकर व अश्विनी जाधव नगरसेवक झाले होते.गेल्या निवडणुकीत चार सदस्यांचा प्रभाग झाल्यानंतर, दोन्ही पक्षांची आघाडी होऊन हे चारही नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्या वेळी राष्ट्रवादीच्या जाधव यांचा पराभव झाला. झालेल्या मतदानावरून तेव्हाच दोन्ही पक्षांत वाद सुरू झाले. काँग्रेसच्या भागात राष्ट्रवादीला सुमारे एक ते दोन हजार मते कमी पडल्यामुळे पराभव झाल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा आहे. तर, स्थानिक परिस्थितीमुळे मतविभागणी होऊन मतांची गणिते बदलली, असा काँग्रेसचा दावा आहे. मानकर व कदम चांगल्या मताधिक्यांनी निवडून आले होते. मात्र, दोन्ही नगरसेविकांच्या प्रभागातील लढती चुरशीच्या ठरल्या होत्या.

नवीन प्रभागरचनेत कँग्रेस समर्थकांचाही समावेश

नवीन प्रभागरचनेत काँग्रेसला मानणारा सुतारदरा व लगतचा सुमारे पंचवीस ते तीस टक्के भाग नवीन प्रभाग क्रमांक 32 (भुसारी कॉलनी- सुतारदरा) मध्ये समाविष्ट झाला आहे. काँग्रेसला मानणारा मतदारांचा मोठा वर्ग लगतच्या प्रभागात गेल्याचा आधार घेत प्रभाग 30 मध्ये राष्ट्रवादीने जादा जागांवर दावा केला आहे. दीपक मानकर, हर्षवर्धन मानकर, तसेच तृप्ती शिंदे, कांता खिलारे, दीपाली गायकवाड, पूजा शिर्के, दीपाली ढोक राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत.

काँग्रेसकडून रामचंद्र कदम, वैशाली मराठे हे विद्यमान नगरसेवक, संदीप मोकाटे, हरिभाऊ सणस इच्छुक आहेत. गेल्या निवडणुकीत काँग्रेसकडे दोन जागा होत्या, तसेच कदम कुटुंबीय सुमारे तीन दशके या भागातून महापालिकेत प्रतिनिधीत्व करीत असल्याने, कदम येथूनच निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांना प्रभाग 32 मधूनही संधी आहे. भाजपकडून छाया मारणे, अजय मारणे, संतोष अमराळे, रणजित हरकुडे, श्रीधर मोहोळ, संदीप मोरे, अनिता तलाठी इच्छुक आहेत. भाजपने गेल्या वेळी एक जागा जिंकली, तर तीन जागांवर क्रमांक दोनवर होते. त्यामुळे भाजप या वेळी शर्थीने निवडणुकीच्या रिंगणात उतरेल. शिवसेनेकडून नितीन शिंदे, शर्मिला शिंदे, पुरुषोत्तम विटेकर, जयदीप पडवळ, सविता मते यांची नावे चर्चेत आहेत.

…त्यांनाच या वेळी संधी मिळण्याची चर्चा

महाविकास आघाडी झाल्यास व तिन्ही पक्षांनी जागा वाटप नीट केल्यास, येथील लगतच्या तीन प्रभागांत ते एकत्रितरीत्या भाजपपुढे मोठे आव्हान उभे करू शकतात. काँग्रेस स्वबळावर लढल्यास, त्यांचा राष्ट्रवादीशीच सामना होईल. आघाडी झाली व राष्ट्रवादीला पुरेशा जागा न मिळाल्यास, येथे मैत्रीपूर्ण लढतीचीही शक्यता आहे. त्यामुळे, आघाडीच्या नेत्यांची जागा वाटपाच्या वेळी कसोटी लागणार आहे. जे नगरसेवक आणि कार्यकर्ते गेली पाच वर्षे विशेषतः कोविड साथीच्या काळात कार्यरत होते, त्यांनाच या वेळी मतदारांकडून संधी मिळेल, अशी या भागात कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू आहे.

अशी आहे प्रभागरचना

जयभवानीनगर, केळेवाडी, वेताळ टेकडी, रामबाग कॉलनी, गिरीजा सोसायटी, शीलाविहार कॉलनी, एमआयटी, शिल्पा सोसायटी, किष्किंधानगर, ऋतुजा रेसिडेन्सी, लोटस कोर्ट, जयभवानीनगर, शिवतीर्थनगरचा भाग, रामबाग कॉलनी, वसंतनगर, मोरेश्वर वसाहत, भारत कुंज, मोरे विद्यालय, हनुमाननगर.

  • लोकसंख्या – 60,237
  • अनुसूचित जाती – 4,893
  • अनुसूचित जमाती – 486

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news