

लोणी काळभोर: विक्रेता परवाना न घेता पुणे जिल्ह्यात गौण खनिजांचा साठा, वाहतूक व विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. या आदेशानुसार पूर्व हवेली तालुक्यात विनापरवाना गौण खनिज व्यवसाय करणाऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी लोणी काळभोर तहसील कार्यालर्याने वीज कंपनीशी पत्रव्यवहार केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गौण खनिज व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) नियम, 2013 नुसार गौण खनिज विक्रीसाठी विक्रेता परवाना तसेच साठवणूक परवाना घेणे बंधनकारक आहे. शासन निर्णयान्वये खडी व स्टोनक्रशर धारकांनीही या नियमांनुसार व्यापारी परवाना घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच खडी व स्टोनक्रशरसाठी वापरण्यात येणाऱ्या गौण खनिजाबाबत परिशिष्ट- अ (आवक नोंदवही) व परिशिष्ट- ब (जावक नोंदवही) ठेवणे सक्तीचे असून, त्याची तपासणी क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी वेळोवेळी करणार असल्याचेही आदेशात नमूद आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यात एकूण 379 स्टोनक्रशर कार्यरत आहेत. या सर्व क्रशरची तपासणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या असून, विनापरवाना गौण खनिज साठा व विक्री करणाऱ्यांवर दंडात्मक तसेच फौजदारी कारवाईचे आदेश सर्व तहसीलदारांना देण्यात आले आहेत.
त्यानुसार तहसील कार्यालयांकडून संबंधित व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या परवान्यांची मुदत 31 डिसेंबर 2025 रोजी संपुष्टात येत असल्याने, सर्व क्रशरधारक व साठा परवानाधारकांनी सन 2026 साठी तातडीने विक्रेता व साठा परवाना नूतनीकरण करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा खनिकर्म विभागात नमुना- ‘प’ नुसार आवश्यक कागदपत्रांसह https://mahakhanij.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे. दरम्यान, परवाना न घेता गौण खनिज व्यवसायिकाचा थेट वीजपुरवठा खंडित करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने अवैध गौण खनिज व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.