पुणे: सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यात यावा, यासाठी महापालिकेने वडगाव ते पु. ल. देशपांडे उद्यान (जनता वसाहत) यादरम्यान बांधलेल्या कालव्यालगतच्या रस्त्यावर सध्या बिनदिक्कतपणे राडारोडा टाकला जात आहे.
हा राडारोडा महापालिकेचाच असल्याचे काही जण सांगत आहेत. मात्र, या प्रकाराबाबत प्रशासन संपूर्णपणे अनभिज्ञ आहे. या ठिकाणी राडारोडा टाकणार्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली आहे. (Latest Pune News)
हिंगणे, वडगाव, सनसिटी, धायरी, नर्हे, खडकवासला, खानापूर आणि पानशेत परिसरात मोठ्या प्रमाणात इमारती उभ्या राहिल्या असून या परिसराचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण झाले आहे. या भागातील नागरिकांना शहरात येण्यासाठी सिंहगड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने महापालिकेने राजाराम पूल ते फन टाईम थिएटर दरम्यान उड्डाणपूल देखील तयार केला.
यातील एक बाजू सुरू करण्यात आली असून दुसरी बाजू लवकरच सुरू होणार आहे. यापूर्वी वडगाव ते पु. ल. देशपांडे उद्यान (जनता वसाहत) यादरम्यान मुठा कालव्यालगत 7.5 मीटर रुंदीचा रस्ता पालिकेने तयार केला होता. मात्र, याच रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकला जात आहे. विश्रांतीनगर ते जनता वसाहत या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना भरदिवसा डंपरच्या साहायाने हा राडारोडा टाकला जात आहे.
इमारतींच्या बांधकामातील दगडी, सिमेंट, माती तसेच डांबरी रस्त्याच्या कचर्याचा देखील यात समावेश आहे. खडकवासला धरण ते पर्वती जलकेंद्र दरम्यान कालव्यालगत कोट्यवधी रुपये खर्च करून भूमिगत जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण पाईपलाइनवरही राडारोडा टाकला जात आहे. या बाबत स्थानिकांना विचारले असता, हा राडारोडा महापालिकेचाच असल्याचे सांगण्यात येते. मात्र, याबाबत सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय आणि पथ विभागातील संबंधित अधिकार्यांना विचारले असता त्यांना या प्रकाराची कसलीही माहिती नसल्याचे समोर आले आहे.
या रस्त्याच्या कडेला टाकण्यात येणार्या राडारोड्याबाबत माहिती नाही. हा प्रकार घडत असेल तर गंभीर आहे. आमचा कोणी ठेकेदार हा राडारोडा टाकत असेल, तर त्याची माहिती घेऊन त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
- ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महानगरपालिका